शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

शब्द
















शब्द
****


कुठली तरी एक कल्पना
कुठला तरी एक विचार
प्रकट होतो डोक्यात
उमलतो हृदयात
एक स्फुल्लिंग होत

शब्द जणू  असतात
वाट पाहत
अन पडतात
येऊन धडाधड
जणू समिधा होत

ज्ञानदेव नामदेव तुकाराम
समर्थ एकनाथ चोखोबा मुक्ताई
असे मायबाप उभे असतात
पाठीमागे
घेऊन आपली शब्दसंपत्ती
इतकी की
माझे दोन्ही हात अपुरे पडतात

पाडगावकर विंदा इंदिरा संत
शांताजी आरती प्रभू कुसुमाग्रज
वैद्य सुर्वे ढसाळ आणि बापट
आणि किती एक
परममित्र होत
दाखवतात मला वाट
उघडतात नवनवीन गुपित
कवितेच्या जगातील
शब्दांच्या विभ्रमाची
भावनांच्या प्रकटीकरणाची

खरंच या कवितेच्या जगात
खूप श्रीमंत आहे मी
असे क्वचित कुणी असतात
हे ही जाणून आहे मी

इयत्ता चौथीत लिहलेल्या
पहिल्या कवितेपासून
पन्नाशी उलटूनही तरीही
वाहणारा हा शब्दांचा प्रवाह
हि आकाशगंगा
मला टाकते भारावून
स्तिमित करून

भेटणारा प्रत्येक नवीन शब्द
वाटतो एक नवे नक्षत्र
अन मग मी त्याचा वेध घेत
पाहतो त्यास कुतुहलाने
राहतो निरखीत आनंदाने

हे वेड मला मिळालेय
वारसा म्हणून
माझ्या वाडवडिलांकडून
मुक्तेश्वरापासून
माझ्या छोट्या इशानपर्यंत
आलेले उतरून
म्हणूनच शब्द हेच माझं विश्व ,
वंश धर्म अन् जात आहे
हे मी सांगू शकतो अगदी ठासून


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...