मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१८

स्वर्ग बाजार



स्वर्ग बाजार
********

अहो देवांचे ते खास
तया हात लावू नका
होय म्हणती तोवर
पाने फुले वाहू नका

शब्द तयांचे प्रचंड
देवा लावती कामाला
न्याय मिळतो कधी का
कुणा विना रे वकीला

आधी नमन तयाला
मग भेटा रे देवाला
पैका आहे ना गाठीला
ना तो लागा रे वाटेला

भय आहे ना तुम्हाला
स्थैर्य हवे ना उद्याला
तर मग चला चला
देवा लावाया वशिला
----
देवा मागता तयाला
खुळा विक्रांत फसला
तया टाळून बैसता
देव आत सापडला 

कर्मकांडाचा पसारा
धैर्ये चुकवला सारा
खोटा तुटता पिंजरा
आले आकाश आकारा

आत पाहिले पाहिले
डोळे अंधारा फुटले
ज्योत जाणिवेची स्थिर 
स्वर्ग बाजार मिटले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...