*************
अनावर ओढीत त्या
त्यजिले मी सारे सारे
घरदार वैभवाचे
सखी सुखासीन वारे
वेढूनिया तपस्येचा
धगधगता अंगार
वस्त्रही देहावरून
दिधले लोटून दूर
डोईवरी सूर्य अन्
तापलेली माती होती
श्वासात अंगार सारे
पण स्वप्न तेच दिठी
किती वेळ ठाऊक ना
दिन गेले उलटून
गर्द हिरवे मी पण
गेले कधी हरवून
अचानक आत मग
उमलून आले काही
अलोट लाट प्रेमाची
ये भरून दिशा दाही
कणकण मोहरला
क्षणक्षण झाला दंग
अंतरी पळस फुलांचा
बहरला जणू रंग
तेच ऊन तोच ताप
कष्ट दुःख असूनही
भरलेल्या आनंदाची
पसरे जगात द्वाही
उधळतो रंग आता
एक एका पाकळीत
रंगू देत विश्व सारे
सुखानंद हा झेलीत
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा