रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

जमाली जादू






लाल लाल बूढीके बाल
गल्लीत ओरडत येई जमाल

यंत्र जादुई गरगरणारे
घेवून पाठी भले थोरले

खुळखुळणारा खिसा चिल्लर
इवली पिशवी भरली साखर

टोपी लुंगी वहाण तुटले
दाढीत काही केस पिकले

आमच्यासाठी परी जगातले
आश्चर्य त्याच्या यंत्री भरले

लावूनी काडी पॅड्डल मारी
मधुकणिकेची होई जाळी

गुंडाळून मग ती तो हळुवार
कापूस गोळा देई गुलजार

दहा पैशात दहा मिनिटांत
स्वारी जाई जणू स्वर्गात

गोड बोल त्याचे हसरे
शब्द मराठी हिंदीत बांधले

आवो बच्चे खावो भरभर
ढग गुलाबी हो गयी शक्कर


त्या गोळ्याची चव आजवर
रेंगाळते त्या बाल जीभेवर
  
हळू विरघळणारी रेष मधुर
जमा होते अन ओठ कडावर

नंतरही मग खाल्ल्या भरपूर
शुगर केंड्या कुठे मॉलवर

पण जमाली जादू कधीही
जमली नाही कुण्या काडीवर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

मोह ...






मोह 

एक जुनाट सत्य माझ्या
उरामध्ये जळत होते
आणि लोक तरी मज
लाक्षागृही लोटत होते

खांद्यावर वाहिलेले ते
तसे ओझे खोटेच होते
कसे न कळे पण देहाचा
कण कण ठणकत होते  

तसा मोह सिंहासनाचा
नव्हता मला कधीच रे
सुळासाठी सोन्याच्या ते
नि मला पटवीत होते  

जाणुनी जातोय वाटेनी    
जिथे न जाते कधी कुणी
अवेळी मजसाठी तिथे
कुणीतरी ते गात होते

हा काळ पाकळ्यांचा 
हळू हळू ओघळणार
कोमेजले अमरत्व का
कुणी कुणा मागत होते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

बांडगुळे





ते इथले नव्हते कधीच
आणि असणार नाहीत
बांडगुळेच वृक्षावरची   
कधी वृक्ष होणार नाहीत

ते शोषतील रस इथला
नि फुलतील बहरतील
मारतील वृक्ष सारा पण
धन्यवाद देणार नाहीत

रूप त्यांचे गंध त्यांचा अहा
असे किती किती अलौकिक
चोरीची सारीच मिळकत
कबुल करणार नाहीत

आणि पुन्हा फडफडूनी
वाढ होत नाही म्हणुनी
शोक त्यांचा रानावनातील 
कधी कधी थांबणार नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...