गुरुवार, २८ मे, २०२६

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे
***********
दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्खे भाऊ होते आणि माझ्याच वर्गात होते .दत्ता मोठा होता तर ' डिगा लहान होता तसे घरची परिस्थिती चांगल्या असल्यामुळे ते व्यवस्थित राहत होते . त्यांचे वडील शेती करीत तसेच माझ्या त्यावेळीच्या माहितीनुसार क्लब ही चालवीत असत .
गावातील मोजक्या गाड्यांमध्ये त्यांच्याकडे लुना होती ( मी एकदा चालवली होती) 
त्याला अभ्यासात मुळीच गती नव्हती पण पास मात्र व्हायचा .
संपूर्ण शालेय जीवनात मारामारीचे प्रसंग दोन-तीनच, त्यातील दिगा बरोबर झालेली मारामारी मला चांगली आठवते . त्याचे कारण आठवत नाही पण शाळा सुटल्यावर आमची दोघांची मारामारी झाली होती तसा मी शारीरिक बलाने त्याच्यापेक्षा वरचढ होतो पण त्याची आक्रमकता जबरदस्त होती
मी फक्त डिफेन्स करत होतो आणि शेवटी तो हतबल झाल्यावर आमची मारामारी संपली . बाकीच्या मित्रांबरोबर आणखीन थोडे पुढे गेल्यानंतर काही कळायच्या आत त्या गर्दीमध्ये अचानक तो मागून आला आणि माझ्या पाठीवर पट्टीचा एक जबरदस्त वार करून पळून गेला . मी फक्त चकितच झालो होतो , काय झाले मला मुळी कळतच नव्हते . पण मी त्याचा पाठलाग केला नाही . तसा तो मित्र नव्हता पण दत्ताचा भाऊ म्हणून जवळचा होता . कारण दत्ता खूपच प्रेमळ आणि जीवाला जीव देणारा मित्र होता .
पुढे जामखेड सोडल्यानंतर मी  एकदा जामखेडला गेलो होतो त्यावेळेला त्याला मुद्दाम भेटलो होतो  तेव्हा तो पानाची टपरी चालवत होता . त्याने मला प्रेमाने पान ऑफर केले होते पण मी तेव्हा पान खात नसल्यामुळे नाही म्हटले  . बस हीच त्याची माझी शेवटची भेट . आज  राजू निमोनकर चा फोन आल्यामुळे कळले की त्याला हार्ट अटॅक घेऊन त्याचा मृत्यू झाला आहे . वाईट वाटले .
देहावरचे वळ मिटतात 
पण वळाची स्मृती काही मिटत नाही 
अगदी निरुपद्रक असली तरीही .
वैर भावना नसली तरीही .

परमेश्वर त्याला सद्गती देवो .

विक्रांत प्रभालर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...