***
सीतारामच्या हाताचा
तो खूप उकळलेला
काहीसा कडवट घट्ट गोड
पाच सहा घोटात संपणारा
चहा पिता पिता
कितीतरी सकाळ आणि
संध्याकाळ गेल्या होत्या
कामाची सुरुवात आणि
कामाची सांगता झाली होती
तो चहा सितारामचा चहा
मला हिमालयाच्या गुहेत
जरी आणून दिला तरी
मी ओळखीन इतका तो
जिभेच्या मुळाशी जाऊन बसला होता
पण तो चहा बनवणारा मात्र
जाऊन बसला आहे
त्या आदी अंत नसलेल्या शून्यात
सिताराम ची कौटुंबिक माहिती
असल्याचे काही कारण नव्हते
त्याच्या स्वभावाची चिकित्सा
करायची ही गरज नव्हती
तरीही प्रेमाने चहा पाजणारा
आणि पैशाची वाट ही
न पाहता निघणारा
लगबगीने चालणारा सिताराम
डोळ्या पुढे येतो
तसे तसे वजन जास्त नव्हते
वय पन्नाशीच्या आसपास असावे
काटक शरीरयष्टी नेटकी राहणी
तो अगरवाल हॉस्पिटलच्या
गेटचा अविभाज्य हिस्सा होता
आता एम .टी .आगरवाल मधील
एक एक चेहरे हरवून जात आहेत
निवृत्त होत प्रमोशन मिळवत
दूर जात आहेत
हळूहळू एक नवीन जग
तिथे उभे राहत आहे
एका लाटे नंतर दुसरी लाट येते
दुसरी गेली कि तिसरी येते
जीवनाचा हा प्रवाह अनुस्युत आहे
कदाचित आणखीन दहा-पंधरा वर्षांनी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कोणी
ओळखणार सुद्धा नाही .
हा विचार आल्यावर वाटायचे कदाचित
त्या गेट मध्ये उभा असलेला सिताराम
तरी आपल्याला ओळखेन
आनंदाने हाक मारेन अन प्रेमाने चहा पाजेन
आणि पैशासाठी खिशात घातलेला हात
वरती ही काढू देणार नाही .
पण आता ती ही वेळ येणार नाही
याची खिन्नता वाटते .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .