निरोप ( विसर्जन)
*****
अन् पुन्हा निघालास
कसे दिवस उलटले
कळले नाही कुणास ॥१
तुझे स्थान हृदयात
जरी का नित्य असते
स्मरणात तुझ्या सदा
चित्त पुलकित होते ॥२
पण येतो घरी जेव्हा
विश्व चैतन्यात न्हाते
आनंदाने घरदार
अवघे भरून जाते ॥३
पण निघतोस तेव्हा
क्षण येता निरोपाचे
बळे रंगूनिया रंगी
अश्रू लपवी दुःखाचे ॥४
येणे जाणे नित्य जरी
दुःख किती विरहाचे
प्रेम करे त्यास कळे
लाघव या रे प्रेमाचे ॥५
सर्जन विसर्जन हा
खेळ असे तुझा साचा
नटरंगी नायक तू
आदी अंत या विश्वाचा ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
