मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

आला गणपती


आला गणपती
************
आला गणपती आला गुणपती 
आला महामती विद्येचा तो ॥१
आला मिरवत वाद्य गजरात 
बसे मखरात सजलेल्या ॥२
झाली रोषणाई चढली झिलई 
अवघीच घाई घरी दारी ॥३
भरले बाजार पेढे फळे हार 
चालला व्यापार धामधुम ॥४
जमा झाले गावी अवघे ते भाई
भेटीगाठी जीवी जिवापाड ॥५
सज्ज सुगरणी सज्ज सुहासिनी 
पहा कौतुकानी रूप ल्याले ॥६
होतेसे गजर टाळांचा अपार 
गुलाल भुवर विखुरला ॥७
रांगोळ्याची नक्षी मिरवती दारे 
फटाके भूर्नळे हर्ष फुटे ॥ ८
गल्ली  बोळामध्ये मांडले मांडव
विराजित देव थोर तिथे ॥९
अन तयाचा तो वेगळाच थाट 
आरास अफाट मांडलेली ॥१०
 अनंत मूर्तीत एकच तो देव 
डोळीयात भाव प्रेममय ॥११
आता दहा दिस चालू दे दंगल
 नभात मंगल तेज कोंडो ॥१२
विक्रांत आनंद मनात दाटला 
विश्वात भरला ओसंडून ॥१३

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गाणे

गाणे **** काही उरली सुरली  माझी निरोपाची गाणी घेई उचलूनी हाती देई दूर वा सोडुनी ॥१ मुठ करता रिकामी  मुठ मुठ न उरते  होते साठवले ...