मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

महाडच्या पोरेबाई( शिक्षक दिनानिमित्त)

महाडच्या पोरेबाई( शिक्षक दिनानिमित्त)
**************

महाडच्या एक नंबरच्या दगडी शाळेत 
अहमदनगरच्या खेडवळ तालुक्यातून  
आलेला तो तिसरीला पोरगा 
काळेला गावंढळ बरचसा हडकुळा 
प्रचंड अशुद्ध बोलणारा न व ण न कळणारा 
कुठलीही रितभात न पाळणारा 
पण चौकस नजरेचा हपापून जग बघणारा  दिसणारे सारे डोळ्यात साठवणारा
 शाळेत आला की व्हायचा एकदम बुजरा 
त्याला मिळाला एकच मित्र 
तोही त्याच्यासारखा नवीन पण बडबडा 
अन् पक्का कोकणी 
त्याचा एकमेव आधार
बऱ्याच  दांड्या मारणारा 
बाकी साऱ्याकडून  वाळीत टाकल्यागत 
तो  असायचा मागे बसत 
एकटा एकटा 
शाळा सुटायची वाट पाहत 
टारगट पोराकडून उगाचच मार खात 
..**
तिसरीतल्या बाई तर लक्ष द्यायचा नाहीत 
त्या काय शिकवतात काय नाही 
कुणास माहिती 
त्याच्या डोक्यात काही शिरायचेच नाही 
त्यांच्या डोळ्यातील तुच्छता दुर्लक्ष 
त्याला काही ग्रहणच करू द्यायची नाही 

सगळे जग धूसर होते 
आणि दिवस भरभर उलटत होते 
एका बागेतून उपटून 
दुसऱ्या बागेत लावावे तसे
रोप मरगळलेले होते
ते थांबलेले थबकलेले जीवन होते 
जरी जीव धरत होता मुळे पसरत होती 
पण अस्तित्व तसेच होते 
 न वाढणारे न फुलणारे
जगणे झाले होते गारगोटीगत 
थंड निष्क्रिय निस्तेज सर्वसामान्य 
**
अन्  तेव्हाच जीवनात आल्या पोरेबाई 
रत्नपारखी नजर घेऊन 
आणि त्यांनी घेतले त्याला जवळ ओढून 
अचानक महत्त्व देऊन वाहवा करून 
गुणाचे कौतुक करून 
त्यांच्या त्या आश्वासक शब्दांनी 
आणि दिलेल्या आधाराने 
हरवला अंधार विरघळली उदासीनता 
भेटला दिलासा पेटला दिवा 
अन जमू लागले सभोवती मित्र मैत्रीत्सुक
करू लागले हुशार मुले स्पर्धा त्याच्याशी 
तो कधी येऊन बसला पहिल्या रांगेत 
त्याला कळले सुद्धा  नाही
ते एक वर्ष सारे जीवन बदलणारे
पंख देणारे उडायला शिकवणारे
होते उमलून आणणारे
आणि त्यानंतर 
सदैव तळपणारी स्वत्वाची जाणीव 
कधीही न विझणारी स्वाभिमानाची  ज्योत 
राहिली अखंड अविरत तेवत
ते झाड तगले जगले वाढले 
स्वतःचा आकार घेऊन फुलाफळांनी बहरले 
****
पण ती माळीन 
कदाचित गेली असेल तेव्हाच त्याला विसरून 
आणि आता कदाचित हे जगही सोडून 
खूपदा ठरवूनही मनात लाखदा पुजुनही
 नाही जमले त्याला त्यांना प्रत्यक्ष भेटायला 
भीती वाटत होती त्याला 
कदाचित त्यांनी ओळखलं नाही तर 
खरंतर त्याने फारसा फरक पडला नसता 
वर्षा आली होती ऋतू बरसला होता 
आणि कृतज्ञता भरून धन्यवाद मनात ठेवून 
हे झाड जगले होते
जगत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

1 टिप्पणी:

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...