रविवार, १० ऑगस्ट, २०२५

नर्मदामाय

नर्मदामाय
*********
माझे येणे तुझ्या दारी 
घडेल गं कधी माय
मनातील आस माझ्या
पुर्णत्वा जाईल काय ॥

तुझे जळ खळखळ 
मधू रव नादमय
शिरातून सुरावेल 
कधी होत गीत गेय॥

स्मृती तप केले बहु 
पावलात ओढ आता 
आहे किंवा नाही बळ 
कशाला ग मला चिंता ॥

हळुवार काढ बेड्या 
पायात या रुतलेल्या 
तनमन मुक्त कर
लहरीत आंदोळल्या ॥

चालव गे हळूहळू
लहरीत आळूमाळू 
खडे काटे उन पाणी
दावूनिया नको टाळू॥

पडू दे गं हवा तर
तुझाच हा  देह आहे
तुझी माती होण्याहून 
थोर काय भाग्य आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धुनी

धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट  जल गेले हरपून  नील रत्न सागरात परी राहिला ओंड...