नर्मदामाय
*********
माझे येणे तुझ्या दारी घडेल गं कधी माय
मनातील आस माझ्या
पुर्णत्वा जाईल काय ॥
तुझे जळ खळखळ
मधू रव नादमय
शिरातून सुरावेल
कधी होत गीत गेय॥
स्मृती तप केले बहु
पावलात ओढ आता
आहे किंवा नाही बळ
कशाला ग मला चिंता ॥
हळुवार काढ बेड्या
पायात या रुतलेल्या
तनमन मुक्त कर
लहरीत आंदोळल्या ॥
चालव गे हळूहळू
लहरीत आळूमाळू
खडे काटे उन पाणी
दावूनिया नको टाळू॥
पडू दे गं हवा तर
तुझाच हा देह आहे
तुझी माती होण्याहून
थोर काय भाग्य आहे ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .