रविवार, ३० एप्रिल, २०१७

दत्ताच्या रावुळीदत्ताच्या रावुळी
चालले भजन
करितो श्रवण
भक्तिभावे ||
सुरांचे चांदणे
भावना वर्षाव
रंक अन राव
रंगलेले ||
थोर पाठांतर
सुबक उच्चार
टाळ झांजावर
शब्द पडे ||
काय त्यांची श्रद्धा
अहा त्यांचा भाव
भक्तीचे सावेव
रूप जणू ||
विक्रांत हिंपुटी
शब्द सुराविन
देई आवतन
हृदयात ||
घेई स्वीकारून  
बोबडे बोलण
दत्त कृपाघन
मायबाप ||

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

चांगलीतू एवढी चांगली का आहेस
या प्रश्नांचे उत्तर तिच्याकडेही नाही
त्यावर ती फक्त हसते
फुलातून उमलणाऱ्या सुगंधागत
आणि असे काही नाही म्हणून
ते चांगुलपण नाकारते

त्या चांगल्या कामातून मिळणारा आनंद
जणू तिच्या उर्जेचा स्त्रोत आहे
तो सहजच देण्याचा आनंद
जणू तिच्या प्रसन्नतेचा झरा आहे
ती सहज उलगडणारी आत्मीयता जणू
तिच्या भोवती असणारे वलय आहे

आणि त्या तिच्या वलयात
त्या आनंदाच्या चांदण्यात
सभोवताल न्हावून निघत असतो

सारेच तिचे कौतुक करतात असे नाही
कुणी तिचे काम करतात असेही नाही
कुणी कुणी तर दखल ही घेत नाही

पण ती तशीच राहते सरीतेगत वाहत
कसलीही पर्वा केल्यावाचून
उतार वळणावर खळाळत
कुठे अथांग डोह होत थांबत  
कुठे सहस्त्रधारांनी तुषार वर्षत
दोन्ही तीरावरुन भरभरून वाटत
वाटेत भेटलेल्या साऱ्यांना स्नेह देत

आणि तिचे हे आनंदाने वाहणे
लांबूनच पाहणे सुद्धा
किती आल्हाददायक आहे
हे क्वचितच कुणाला कळते


 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

निघून गेलीस तरीही

तू सुंदर आहेस जगणेही सुंदर आहे
तू जीवनात असणे सुंदरतेचा कळस आहे
आणि जर कदाचित
तू माझ्या जगातून निघून गेलीस तरीही
जगणे तसेच सुंदर राहील
थोडे टोचेल थोडे खुपेल
अन दु:खाने मन कळवळेल
एखादा व्रण कायमचा आत बसेल
पण त्या तुझ्या जाण्याने
मोडून पडावे असे हे जीवन
अगदीच दुबळे अन व्यर्थ नाही
खरतर जीवनाला असे
गळ्यात गळा घालून जगायचे
मी तुझ्याकडून शिकलो आहे
तुझे रंगात मिसळून जाणे
तुझे गंधात हरवून जाणे
तुझे शब्दात विरघळणे
अन दु:खाला कवटाळून
चिडून भिरकावून देणे
ते तुझे उत्कट खरेपण
ते भरकटल्याचे समर्थन
बेपर्वा बेदरकार पण
अन नागिनी सारखे झटकन
फणा काढणारे आत्मभान
हे एवढे आणि हे सारे
तू मला दिल्यावर
जर मी राहिलो तसाच पूर्वी सारखा
माझे रडणे सांभाळणारा
मान खाली घालून चालणारा
तर तो अपमान होईल तुझा
अन जीवनाचाही

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

  

बुधवार, २६ एप्रिल, २०१७

तूच माझी कविता
हे माझे शब्द सारे तुझेच गीत गात आहे
खर तर तूच माझी कविता एक मूर्त आहे

तरीही शब्दांचा गोड अट्टाहास हा तुझा
मी मेघ होवून तुझ्यासाठी कोसळत आहे

कोसळून तुलाच सखी चिंब भिजवत आहे
तुझ्यासवे अन माझे अस्तित्व हरवत आहे

तुझे स्पर्श तुझे बोल होवून एकरूप यात 
पापण्यात तुझ्या बघ मीच ओघळत आहे

कळेना मला दिलेस काय तू मी घेतले
सहवासी तुझ्या मी आकंठ जगत आहे

पाहूस नको भोवताली जग साचलेले व्यर्थ
मी तुझ्यात तू माझ्यात अखंड वाहत आहे  

जाशील माघारी जेव्हा तू दिन सांजवता हळू   
दाटून आकाश माझे सदा तुझ्या सवेत आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर  तिकोणे

http:/kavitesathikavita.blogspot.in 

सोमवार, २४ एप्रिल, २०१७

तुझी माझी ही कहाणी
शेंडा बुडखा नसली
तुझी माझी ही कहाणी
वेड्या नशिबा आलेली
जाग अर्ध झोपेतुनी

कुणी नशेत कुठल्या
गाठी टाकल्या बांधुनी
मोळी चालली मुकाट
कुठे जळण होवुनी

तश्या येतात कविता
शब्द सवयी मागुनी
कुण्या मनात राहती
ऋतू निर्झराची गाणी
    
अर्थ हरवले सारे
पाणी तळ्यात पडुनी
माळरानी खळग्यात
आले पोपडे उलूनी

चार बांधले कोपरे
चार दशके जगाया
कुणा कळती बाहेर
जरी अंधार एकट्या

भान उतार प्रवाही
त्याला काळवेळ नाही
बीज हुंकारे मनात
उब ओल लागताही

ठसे जागोजागी तेच
तीच उसवली गाणी
जन्म विरतो विटतो
घ्यावा वाटतो रंगुनी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


रविवार, २३ एप्रिल, २०१७

माय

माय

काळ्या भयाण रातीला
माय आकाश व्यापून
वस्त्र रात्रीचे कराळ
येते गडद नेसून

माय सावळी सुंदर
डोळी चंद्रप्रभा ल्याली
तेज सावळ्या देहाचे
साऱ्या ताऱ्यात ओतली

गळा रुंड सुमनांची
माळा बांधली कुंतली
हस्त वस्त्र कटीवरी
रंग रुधिरी नटली

माय विशाल नेत्रांची
विश्व काजळी सजली
तिच्या केसाकेसावरी  
कोटी नक्षत्रे ठेवली

माय भीषण सुंदर
माझ्या हृदयी बसली
कणाकणात चैतन्य
रूप जगदंबा झाली

माय रणात वनात
सवे घेवुनिया जाई
बाळ विक्रांत ओटीत
सदा प्रेमभरे घेई

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

जा शोध जा पुन्हा तूबांधून भग्न गाणी जा वाट ही चालुनी
असेल थांबली कुठे तुजसाठी ती सजनी

अरे दुनिया तशीही बघ थोर फार नाही  
भरुनी जखमा साऱ्या मिटतील वेदनाही

थांबू नको कधीही घेवून मृत्यू मिठीत
तू जीवन प्रवासी रे बांध स्वप्न दिठीत

कानात गुंजणारे सूर आले स्पंदनात
जा प्राण पेटवूनी तू शब्द नवे गुंफत  

देतील तारका तव साथ साऱ्या पथात
उमलेल वाट धरती नीत तुझ्या पावुलात  

जा शोध जा पुन्हा तू जा भेट जा पुन्हा तू
मिळेल शांती जीवा ते स्थान जा शोध तू


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोनेऐकणरे भेटते तेव्हा

ऐकणारे भेटते तेव्हा ****** जेव्हा कोणी ऐकणारे भेटते तेव्हा  शब्दांनी भरून येते आकाश अन  कोसळते अनावर होऊन थांबवल्या वाचून थांबल्...