शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

चांगली



तू एवढी चांगली का आहेस
या प्रश्नांचे उत्तर तिच्याकडेही नाही
त्यावर ती फक्त हसते
फुलातून उमलणाऱ्या सुगंधागत
आणि असे काही नाही म्हणून
ते चांगुलपण नाकारते

त्या चांगल्या कामातून मिळणारा आनंद
जणू तिच्या उर्जेचा स्त्रोत आहे
तो सहजच देण्याचा आनंद
जणू तिच्या प्रसन्नतेचा झरा आहे
ती सहज उलगडणारी आत्मीयता जणू
तिच्या भोवती असणारे वलय आहे

आणि त्या तिच्या वलयात
त्या आनंदाच्या चांदण्यात
सभोवताल न्हावून निघत असतो

सारेच तिचे कौतुक करतात असे नाही
कुणी तिचे काम करतात असेही नाही
कुणी कुणी तर दखल ही घेत नाही

पण ती तशीच राहते सरीतेगत वाहत
कसलीही पर्वा केल्यावाचून
उतार वळणावर खळाळत
कुठे अथांग डोह होत थांबत  
कुठे सहस्त्रधारांनी तुषार वर्षत
दोन्ही तीरावरुन भरभरून वाटत
वाटेत भेटलेल्या साऱ्यांना स्नेह देत

आणि तिचे हे आनंदाने वाहणे
लांबूनच पाहणे सुद्धा
किती आल्हाददायक आहे
हे क्वचितच कुणाला कळते


 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...