तू सुंदर आहेस जगणेही सुंदर आहे
तू जीवनात असणे
सुंदरतेचा कळस आहे
आणि जर कदाचित
तू माझ्या जगातून
निघून गेलीस तरीही
जगणे तसेच सुंदर
राहील
थोडे टोचेल थोडे
खुपेल
अन दु:खाने मन कळवळेल
एखादा व्रण
कायमचा आत बसेल
पण त्या तुझ्या
जाण्याने
मोडून पडावे असे हे
जीवन
अगदीच दुबळे अन
व्यर्थ नाही
खरतर जीवनाला असे
गळ्यात गळा घालून
जगायचे
मी तुझ्याकडून
शिकलो आहे
तुझे रंगात
मिसळून जाणे
तुझे गंधात हरवून
जाणे
तुझे शब्दात
विरघळणे
अन दु:खाला
कवटाळून
चिडून भिरकावून
देणे
ते तुझे उत्कट
खरेपण
ते भरकटल्याचे
समर्थन
बेपर्वा बेदरकार
पण
अन नागिनी सारखे
झटकन
फणा काढणारे
आत्मभान
हे एवढे आणि हे
सारे
तू मला दिल्यावर
जर मी राहिलो
तसाच पूर्वी सारखा
माझे रडणे
सांभाळणारा
मान खाली घालून
चालणारा
तर तो अपमान होईल
तुझा
अन जीवनाचाही
डॉ.
विक्रांत प्रभाकर
तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा