गाणगापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गाणगापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

नको मज हंडा






नको मज हंडा

****

तुझ्या मोहरांचा
नको मज हंडा
राहू दे घेवडा
दारातला ॥
.
नित्य येई घरा
सेवा ही स्वीकारा
अनित्याचा वारा
नको दत्ता ॥
.
देऊनी संपत्ती
जर तुझे जाणे
नको देऊ देणे
मज असे ॥
.
संपत्तीने मद
देवा घडतसे
जगी दिसतसे
सर्वत्र हे ॥
.
म्हणूनिया देई
अन्न पोटभर
वस्त्र अंगावर
पुरे असे ॥
.
धन उधळणे
व्याख्या ही सुखाची
वाच्छा भोगण्याची
नसू देरे ॥
.
विक्रांत जीवन
तुझ्या कृपेन
जाऊ दे भरून
दया घना॥
.

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, ३१ मे, २०१९

ओवळा




ओवळा 
******
सोवळ्या वस्त्राला चाले 
ओवळा तो का रे पैसा 
विटाळतो माणसाला 
माणसाचा स्पर्श कैसा 

जात माणसांची मोठी 
देवाहून असते का ?
घाबरून तुझी माझी 
देव पूजा चालते का ?

जातीपातीचे हे गट 
कळपाचे का रक्षक 
तेच अन्न खातो ना रे 
संत भक्त नि भिक्षुक 

त्याच संवेदना आत
तिच स जाणण्याची 
तीच कळ अंतरात
तुकोबा नि चोखोबाची

दत्ता दे रे मती काही 
रीतभात बदलाची 
सर्व कर्मकांड वर्ण 
गुढी उभार आस्थेची 

दास विक्रांत ओवळा 
विनवितो दत्ता तुला 
असा धर्म देई जगा 
स्वीकारी जो माणसाला 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

*****


सोमवार, ११ मार्च, २०१९

दत्त प्रभूच्या भेटीला




दत्त प्रभूच्या भेटीला
जाई गाणगापूरला
चित्त हरवो तयात
मन प्राण संगमाला

तिथे नांदतो कैवारी
मु निर्गुणी सजूनी
खेळ बाहुल्यांचा तोही
जरा घे रे  पाहुनी

घाल साद रे तयाला
सार्‍या सोडून भयाला
बाहृदया मधला
असे बाहेर बैसला

तुच पाहण्या तुजला
जणू दर्पण ठेविला
मूर्त लोभस आतली
दिसे ऊन उजेडाला

दत्त विक्रांता मधला
पाहू जाता रे कळला
देत थाप नि म्हणाला
थांब इथेच सदाला

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

जडल्या जीवाचे *

जडल्या जीवाचे
**********

जडल्या जीवाचे
करू तरी काय
सरले उपाय
सारे आता

कासावीस मन
ओढाळ होऊन
येतसे धावून
तुझ्याकडे

आनंदे पाहिन
हृदय ठेवींन
जीव हा वाहीन
तुझ्या पदी

डोळिया दाटली
माझिया कृष्णाई
देवा नरहरी
भेटी देई

विक्रांत याचक
भक्तीचा भिकारी
तुझिया पायरी
आसावला ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

हृदयी ठेवी दत्त भगवान





मना करी रे करी ध्यान
हृदयी ठेवी दत्त भगवान ||
मना सांडी रे सांडी व्यथा
जना सांग धन्य गुरुकथा
गुरुचरित्र असे हे तारक
तुटे कोटी जन्म बंधन ||१ ||
मना चाल रे चाल शिखरी
देव दत्त बघ गिरनारी
काय वर्णू तेथची बात
कणकण गर्जे दत्त गाण ||२ ||
मना जाई रे जाई कृष्णातीरी
गुरुपीठ श्री गाणगापूरी
दंड धरून गुरु नृसिंह
भक्ता रक्षी रूपी निर्गुण ||३||
मना थांब रे थांब क्षणभर
प्रेमे आळव दत्त दिगंबर
घडो वा न घडो तप ध्यान
प्रभू येतील रे धावून ||४ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




मंगळवार, ८ मार्च, २०१६

भूत बाधित






दत्ताच्या मंडपी होताच जागर
आले अंगावर वारे तिच्या ||
पंधरा वर्षाची बाधित बहिण
करीतो राखण भाऊराया  ||
झेलितो तिजला पडताच खाली
वस्त्रे विस्कटली नीट करी ||
गरगरा जाता धावतो मागुती
सांभाळे स्वहाती फुलापरी ||
तया आरतीची शुध्द ना गर्दीची
चिंता बहिणीची सर्वकाळ ||
डोळ्यात वेदना मळभ दुःखाचे
अकाली उद्याचे प्रौढपण ||
कुणाची परीक्षा असेही कळेना
विचित्र जीवना खेळ कैसा ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...