गुरुवार, २८ मार्च, २०२४

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी
***********
स्वप्न हरखले डोळीया मधले 
स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१
नभात लक्ष दीप उजळले 
अन चांदण्याचे तोरण जाहले ॥२
कणाकणातून स्फुरण उठले 
खुळ्या अस्तित्वाचे भान हरपले ॥३
गिळून मीपण मीपण उरले
स्थळ काळाचे या भानही नुरले ॥४
ऐशिया प्रीतीने मजला व्यापले 
श्रीपादाची सखी अनन्य मी झाले ॥५
जगत दाटले या मनामधले 
मन हरवता मनास कळले ॥६
तोच तो विक्रांत तेच ते जगणे 
क्षितिज सजले दिसते वेगळे ॥ ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

वाढदिवस

वाढदिवस
*******
तसा तर दरवर्षी 
येतो तुझा वाढदिवस 
दरवर्षी म्हणतो मी तुला 
सुखात जावो वाढदिवस 
पण खरे तर सुखाची 
मीच मला देतो भेट 
तुझ्या असल्यामुळेच 
माझ्या या जीवनात 
आनंद प्रकटतो थेट 
काही मागितल्या वाचून 
कोणाला काही मिळते 
तेव्हा त्याचे मोल 
खरच किती अनमोल असते 
तशी कृपा होऊन तू 
माझ्या जीवनात अवतरते 
ती कृपा झेलता झेलता 
माझ्या मनी गाणं उमटते
धन्यवाद देत तुला मन 
काठोकाठ भरून जाते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २१ मार्च, २०२४

मोरपीस

मोरपीस
*******

माझेपण तुझ्यासाठी जन्मोजन्मी व्याकुळले अव्याहत आस तुझी डोळ्यात पखाली झाले ॥१

 भिजूनिया वाटा गेल्या घाट ओले चिंब झाले 
जन निंदा झेलुनिया काळजाचे पाणी झाले ॥२

 तुझ्यावरी उगारले कटू बाण साहू कसे
तन मन विद्ध माझे परी तुला सांगू कसे ॥ ३

जाणते मी येशील तू तुडवित रानावना
वाटेवरी काटे कुटे  पावुलांना खुपतांना ॥४

परी मज ठाव नाही वेल किती टिकणार 
वादळात जीवनाच्या किती तग धरणार ॥ ५

पुन्हा पुन्हा तुझ्यासाठी जन्म घेणे मान्य मला 
मोरपीस फक्त तुझे लागो माझ्या हृदयाला ॥ ६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

का?



 का ?
*********
दत्त चालविता देह का चालतो 
दत्त थांबविता देह का थांबतो ॥

दत्त हसविता दत्त खेळविता
दत्त जीवनाचा श्वास का असतो ॥

काय स्वरूपाचा प्रकाश विश्वाचा 
मग का कुणाला कधी न दिसतो ॥

दत्त नियमाचा स्वतः त बांधला
कर्म चाकोरीचा दाता का असतो ॥

ऐसिया दत्ताला पहावे म्हणता 
डोळा का रे गर्द अंधार दाटतो ॥

विक्रांत आंधळा अंधारी निजला 
कथा उजेडाच्या व्यर्थ का ऐकतो ॥

मुकीया बोलणे बहिऱ्या ऐकणे 
व्यवहार ऐसा काही का घडतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


रविवार, १७ मार्च, २०२४

गाठोडे


गाठोडे

******

शिणलेले पाय अंधारल्या वाटा

परि भोगवटा सरेचिना ॥ 

कायअसतात खोट्या साऱ्या कथा

 सजवल्या व्यथा  वरवर ॥ 

संपतील श्वास जरी वाटे जीवा 

आयुष्याचा ठेवा डोईजड ॥

सुखाच्या शोधात चालला प्रवास .

उसवतो श्वास अडविता ll 

म्हण दत्त दत्त आटवीत रक्त 

रिते करी चित्त साऱ्यातून ॥

झाले तर झाले किंवा वाया गेले 

जन्म आले गेले बहुसंख्य ॥

विक्रांत गाठोडे फार नाही मोठे

परी खरे खोटे ठाव नाही ॥ 

🌾🌾🌾


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

https://kavitesathikavita.blogspot.com  .

☘☘☘☘ 🕉️ 


 

शनिवार, १६ मार्च, २०२४

अभीर

अभीर
******
निरागसतेच्या प्रसन्न वेलीवर 
अंकुरलेली कळी
उन्मलित न झालेली  
स्व भानाचा डंख न झालेली 
अहमचे केंद्र नसलेली 
मानवी जीवनातील
सर्वोत्कृष्ट स्थिती

गौर कोमल काया 
प्रसन्न मुग्ध हास्य 
सर्व जगाचे 
स्थळ काळ व्यक्तीचे 
आकर्षण करणारे डोळे 
अन् जगत मित्राची अलिखित 
उपाधी मिरवणारी 
ती अबोध निसंगता 

त्या तुझ्या आभा मंडलात 
दाटलेली मंद चंद्र कला
स्निग्ध रुपेरी  किरणांच्या
हळुवार वर्षावात 
प्रसन्नतेने बहरलेले 
प्रत्येक हृदय 

तुझ्या अस्तित्वाने 
बांधले गेलेले कितीतरी 
चिरपरिचित अपरिचित  
व्यक्तिमत्व होती तेव्हा
तिथे त्या सोहळ्यात 
सारे तुला आशिष देत होती 
कौतुक करत होती
पण मला मात्र जाणवत होती
फक्त तुझी शुभेच्छा
तुझ्या अस्तित्वातून  
प्रत्येक हृदयात झिरपणारी
कळत नकळत
कालातित सुखाची आनंदाची 
क्षणस्थ अवकाशाची
मंगलमय वर्षाव करणारी.
म्हणून तुला पुन: पुन्हा 
धन्यवाद आणि आशीर्वाद .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

ओंजळ

ओंजळ
*******
जीवन हातातून 
ओघळून गेले आहे 
आता फक्त काहीसे 
हात ओले आहे 
पण ती ओल ही 
नाही भागवत तहान 
कोणाचीही 
अगदी स्वतःची ही 
ती तिची साथ 
तीही आहे 
क्षणिक आता 
पाहता पाहता  जात आहे  
उडून वाफ होऊन 
त्याचे दुःख मला नाही 
त्याबद्दल वाईटही वाटत नाही 
ते क्रमप्राप्तच आहे 
पण खंत एवढीच आहे की 
ती ओंजळ भरली होती तेव्हा 
मला कोणाच्या पायावर 
वाहता आली नाही 
सर्वस्वाने सर्वार्थाने
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळीया मधले  स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  अन चांदण्याचे तोरण जाहल...