पुत्रशोक
( डॉ. हरेश मंगलानी सरांच्या मुलाच्या, डॉ. रौनकच्या आकस्मक निधनाने उमटलेली व्यथा)
*******
मुलाचे पार्थिव खांद्यावर वाहणे यासारखे दुःख नाही
कुणाच्या जीवनात
आणि या जगात
मुलाचे मरण असते बापाचे मरण
कारण बापच जिवंत राहतो
आपल्या मुलाच्या रूपाने
तो अनुस्युत प्रवाह जीवनाचा
ती अमरता गुणसूत्रांची
ती अखंडता परंपरेची
देशाची मातीची आणि मनाची
खंडित होते एका टोकावर कायमचीच
भग्न होते एक मूर्ती
आपल्या हाताने आपणच निर्माण केलेली सांभाळलेली जपलेली सजवलेली
वर्षांनुवर्षे खपून तिच्यात प्राण भरलेली
कुठल्या तरी अप्रिय घटनेने
अनपेक्षित आघाताने अपघाताने
भंग पावते एक स्वप्न
सर्वात सुंदर स्वप्न
संसार वेलीला येऊ घातलेल्या
नव्या बहराचे नव्या ऋतूंचे
प्राणप्रिय पुत्राच्या भरभराटीचे
ही निर्दयता कुणाची
प्रारब्धाची काळात्म्याची का नियतीची
कळत नाही कणालाच
जन्म जीवन मरणाचे असह्य ओझे
अधिकच जड वाटू लागते
अन् खूपच रग लागते मनाला .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .







