बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

जीवन

जीवन
*****
सर्वच गोष्टींना शेवट असतो 
सुंदर असो वाईट असो 
प्रिय असो अप्रिय असो 
रामायण ही संपते कधी 
महाभारतही संपते 
औरंग्या मरतो कधी 
जातो पापी अफजलही 
हृदयस्थ छत्रपती ही 
जातात जगत सोडूनी
ज्ञानदेव तुकाराम 
नामदेवादी संत मंडळी 
रामदास ब्रह्मचैतन्य 
संपवतात यात्रा आपली 
****
होय विक्रांत तुझीही 
यात्रा आता संपत आली 
एकदा चित्र पुसल्यावर 
ते चांगले होते की वाईट 
कोणालाच फरक पडत नाही 
त्या चित्रालाही 
ते चितारलें जाणे 
ते मिरवणे 
आणि पुसले जाणे 
या कणभर कालक्रमात 
घडते जगणे 
बस तेवढेच 
तेच असते असणे 
त्या अगोदर अन नंतरही 
असतो कागद असतो फळा 
असते पेन्सिल असतो खडू 
असण्यावरतीच हे असणे अवतरते 
असणे होऊन ही नसणे होते
ही निरंतराची 
बुद्धीच्या कक्षेत न येणारी 
व्यापकता पाहता पाहता 
सोडून देते बुद्धी आपले शोधणे 
आणि होते शरणागत 
प्राप्त जीवनाला 
सोडून मोकळे हात 
करून मोकळे अस्तित्व 
अन् मग जीवन 
जगते  जीवन
होवून जीवन

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...