मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

तुझा फोटो

तुझा फोटो
*********
कुठल्यातरी कुणाच्यातरी 
फोटोत दिसलीस तू मला 
अन का न कळे अचानक 
खोलवर काही रुतले मला 

अनवाणी पावलाने 
गवतावरून चालताना 
रुतावा टोकदार खडा 
जसा पावलांना 
वा सहज हातात घेतल्या 
नक्षीदार कपाचा 
लागावा चटका बोटांना 
जखम क्षणिकच 
मारक नसूनही
भिडली काळजाला 

आणि नजर हटेचना 
कळ मिटेचना 
किती वेळ कोणास ठाऊक 
थांबलेला श्वास जड होऊन 
उतरला खाली
ती रिक्तता अपूर्णता 
अणूरेणूतून ठिपकत राहिली 

बरं झालं तू समोर नव्हतीस प्रत्यक्ष
अन्यथा मीही  झालो असतो जड
थिजून पाषाणागत  
तुझ्या नजरेच्या स्पर्शाने
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...