दत्त गाणे
********
मी अवधूत गाणे गातो
मी दिगंबराचे गातो
मी श्रीपादाचे गाणे गातो
मी अत्रिसुतास नमितो
मी अनुसूयानंदास स्मरतो
पण मी हे का करतो ?
मी ही कसली
गुंतवणूक करतो ?
मी नेमके काय मिळवू पाहतो ?
श्रद्धेने साकारलेल्या
आणि मनाला भावलेल्या
या मनोरम विग्रहाला
मी माझ्या जीवनाचा भाग
का करू इच्छितो ?
मी जाणतो
माझ्या भोवती दाटलेला
हा अंधकार
विकार आणि विकाराचा
हा कोलाहाल
दारिद्र्य दुःख दैन्य
विषमता शोषकता
अत्याचार अनाचार आणि युद्ध
या सगळ्यातून उमटणारी
त्या पलीकडे जाऊ पाहणारी
ती वितळलेल्या सुवर्णा सारखी
लखलखित उर्मी
ती उर्मी वाहत राहावी
ती उर्मी जळत असावी
जी जाणू पाहते त्या
अगम्य अनाकलनिय
अगोचर अव्यक्ताला
त्या सर्वव्यापी तत्वाला
ज्याला ती दत्त म्हणते
तो व्यक्त आहे तोच अव्यक्त आहे
तो रंगरूपाचे अंगडे घालतो
स्वतःला सजवतो
किंवा मीच त्याला नटवतो
अन माझ्या मनात मिरवतो
अन त्याचे गाणे गातो
मी त्याला शोधतो
अन मी मलाही शोधतो
म्हणून मी दत्त गाणे गातो
मी अवधूत गाणे गातो
खरतर
मी माझेच गाणे गातो
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा