रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

घटीका

घटीका
******

प्रेताशी शृंगार हवा का 
वदली त्यास ती त्वेषाने
अन मग उलटून कुस
निजली दूरवर क्रोधाने 

मग तो आत थिजलेला
वृक्ष जणू की क्षणात तुटला 
होऊन अवनत धुत्कारलेला
 स्वतःच्याच नजरेत उतरला 

अरे प्रेम का देहात नसते ?
स्पर्श पालवी का न बोलते ?
अखेरच्या त्या पुलाचे परी 
तुकडे तुकडे झाले होते 

कडवट क्षण घड्याळ बोले 
पंखा गरगर वादळ हाले 
अरे तुझे ते सरले जळले 
आसक्तीचे अंकुर बहरले

ही दुःखाची का सुखाची 
घटीका नव्या जगण्याची 
का जुन्यात मरून जायची 
त्याला होती ठरवायची 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...