शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

एक बुद्धिप्रधान दु:ख ..?




केवळ नशिबाने
सत्तेच्या माडीवर बसलेले
चार चाळींचे सरदार
ऐट मारू लागतात
आपल्या पदाचा
आणि
आव आणू लागतात
सर्वज्ञतेचा  
तेव्हा उच्च शिक्षित
समाजातील
सर्वात बुद्धिमान वर्ग
मान घालून गर्क असतो
त्यांच्या प्रश्नांची
उत्तरे शोधण्यात
साऱ्याच ज्ञान सूर्यांना
लागते ग्रहण एकाच वेळी
अन काजवे तळपू लागतात
झुंडीझुंडीनी ...

हे मिंधेपण आले कश्याने
ग्रहण लागले कश्याने
म्हणून पाहू जाता
दिसतात ..
आपल्या एका हाताने
त्यांनी झाकलेले आपुले चेहरे
अन दुसरा हात
बांधलेला आपल्याच पोटाला..
त्यांचे बुड असते
अडकलेले
नोकरी नावाच्या हुकात
जे देत जरी असते 
त्यांना मिंधेपणाच्या 
दु:खाच्या वेदना  
अन आश्वासनही
रिटायरमेंटपर्यंत 
मिळणाऱ्या नियमित 
पगाराचे
दाखवते स्वप्न
कधीहि न संपणाऱ्या
पेन्शनचे  
त्या टीचभर पोटासाठी
अन वितभर सुखासाठी
ते करीत असतात
तीच ती खर्डेघाशी  
स्वत: चे सूर्यपण विसरून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

एका मैत्रिणीची जीवनभिलाषा

 
 
किती वेळा मृत्यू तिला
गेला होता स्पर्शून
कधी अपघाती सापडून 
कधी किडनी फेल होवून

प्रसुतीच्या गुंतागुंतीतून
प्राण पणाला लावून
प्रत्येक वेळी पण ती
आली होती जिंकून

किती पाहिले मृत्यू तिन
कधी प्रियजन गेले सोडून
कधी समोर अज्ञात खून
कधी कुणी गेले वाहून

कुणास ठावूक काय
ठरविले होते जीवनान
कि तिला ठेवले मग 
मृत्यूनाक्यावर आणून

असंख्य मृत्यू घडत होते
जिथे असंख्य कारणानं
तिने पहिले सतत
त्यांना अगदी जवळून

आणि तरीही जीवनावरील
प्रेम तिचे विलक्षण
वाहत राहिले तसेच
उसळत कणाकणातून 

अनित्यत्व देहाचे तिला
कधी न गेले स्पर्शून
वा जगण्यामधली नशा
कधी न गेली हरवून

जीवनभिलाषा तिची
अंकुराची कोवळ तीक्ष्ण
जसा खडक तोडून
येई नव्या उन्मेषान 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

संतजन






करी संतजन | तुम्हाला वंदन |
भाव हा धरून | आदराने ||१||
आपुल्या कृपेने | उमजला धर्म |
परमार्थ वर्म | कळो आले ||२ ||
होतो भटकत | हिताहित नेणे |
आपुल्या प्रेमाने | उद्धरलो ||३||
जीवनाचा अर्थ | प्रेमे सांगितला |
धरुनी हाताला | क्षेम दिला  ||४||
आता चालवावे | तुम्हा हवे तिथे |
नच काही माते | ठरविणे ||५||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

म्हसूबाबाच गाणं २





म्हसूबाबा म्हसुबाबा लवकर उठून जा हो
गावाचा रस्ता जरा खाली करून द्या हो ||
किती वर्ष झाली तुम्ही आडवे इथे पडला
आजी आत्ती पणजीचा बोकड तुम्ही खाल्ला
पुरे झाले सारे आता बस्तान गुंडाळा
प्रकाशाच्या किरणांना वाट करून द्या हो ||१ ||
सरली तुमची भिती सारी पोरं झाली शहाणी
पटकी देवी महामारी गेली बाद होवूनी
कुणी नाही पुसत त्यानं जावं गुमान निघुनी  
दुनियाची रीत तुम्हा ठावूक नाही का हो  ||२||

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/

 




म्हसूबाबाच गाणं १







म्हसूबाबाजींचे घर
असे उंच ओट्यावर
त्याला हवेच्याच भिंती
वर आकाश छप्पर

लाल शेंदरी पोशाख
मस्त बसतो ऐटीत
भय जनाच्या मनात
राज्य करतो झोकात

त्याला ठेवियले कुणी
खोट्या आशेने मांडून
किती दिलेत भयाने
नजराणेही आणून

कुणा मागत तो नाही
कुणा देत किंवा काही
घडो घटना काहिही
श्रेय त्यालाच ते जाई

मना मनामध्ये आहे
म्हसू बाबाचा दरारा
अर्धा गाव अवसेला  
करी तयाला मुजरा

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/



दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...