म्हणतात लोक मजला नाटकी
घालतो फाटकी वस्त्रे उगा ||१
कंजूष भिकारी असून ऐपत
नसेच दानत मज मुळी ||२
तया काय सांगू कोणत्या उपाये
मजला न साहे व्यवहार ||३
काही देणे घेणे म्हणजे करणे
धन जमा उणे जगात या ||४
अश्या या खेळात पैश्याच्या जगात
भावाच्या होतात उर्मी शून्य ||५
धना चिकटता मन हे नासते
क्षणात धावते भोगा मागे ||६
भोगत दु:खांचे सागर दडले
कितीदा पाहिले जन्मोजन्मी || ७
तया त्या दु:खाच्या अदृष्य वेदना
स्मृती स्मृतीविना जाळतात ||८
आता ऐसे काही सांगू जरी जावे
जनासी पटावे कैसे काही ||९
म्हणोनी साहतो मान्य हि करतो
जागी मिरवतो विशेषण ||१०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा