अजूनही
*******
मी जातो अजून त्या तुझ्या वस्ती जवळून ते घर ती झाडी वृक्ष बोलावतात मला खुणावून
मीही दाखवतो ओळख त्यांना कधी थोडेसे हसून
तर कधी गर्दीत मिसळून जातो हळूच टाळून
पण या साऱ्या बाहेरच्या हुलकावण्या
त्याला काहीच अर्थ नसतो हे असतो मी जाणून
कारण मला तू दिसत असतेस अगदी वेशीपासून
तिथे उभी असलेली सजून धजून
कदाचित तुला माहीत नसेल तुझे हे मला दिसणे
अन अगदी चार पावलावरून निघून जाणे
या महानगरात कुणाचे भेटणे आणि दुरावणे
किती साहजिक असते नाही
खरंतर या महासागरात आपल्याला इथे
आपल्या खेरीज कोणीच ओळखतही नसते
तरीही तुझी ओळख अजून का पुसत नाही
ते मला अजूनही कळत नाही
पुसल्यावर गडद होणाऱ्या अदृश्य अक्षरासारखी
उमटत असतेस तू माझ्या अस्तित्वावर पुन:पुन्हा
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .