शनिवार, २६ जुलै, २०२५

श्रावण २ विरह

श्रावणा २ (विरह)
*******
कशाला श्रावणा येशी माझ्या दारा 
घेऊनीया धुंद ऊन पाणी वारा 
तुजला पाहता आठवते कुणी 
 एकटे पणाची खंत ये दाटूनी
तेच अवखळ सरी सम येणे 
सोनेरी उन्हाचे मोहक हसणे 
कधी बोलावणे कधी पिटाळणे 
हिरव्या स्पर्शाने मन मोहवणे 
घडे लपंडाव ऊन सावलीचा 
विकल मनात  पुराण स्मृतींचा 
होतो मंत्रमुग्ध तुज पाहतांना 
परी भंगे तंद्रा हा एकटेपणा
येईन का कधी वाट ती शोधत 
ओढाळ पायांनी ओढच ती होत 
काय बहरेन पुन्हा तो प्राजक्त 
वेचता येईन सुमन एकेक 
तर मी श्रावणा तुजलागी मिठी 
देवुनिया घट्ट ठेवीन रे दिठी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...