साद
*****
माझ्या मनातील माती मज आभाळ मागते
ती दलदल रोजची थोडी कोरड मागते
लाखो पाऊले मनात नीट मोजता ना येते
पाणी भरले खळगे कुणी ओळखू ना येते
कुणी नाचले खेळले कुणी सहजची आले
कुणी कोरूनी बोटांनी चित्र काही रेखाटले
खेळ चिखलाचा परी किती किती खेळायचा
ऋतू बदलून जाता पुन्हा फुफाटा व्हायचा
जरी मागतो आकाश तरी जाणे तोही खेळ
वीज पाऊस आभाळ गती नेसलेला काळ
त्याची अलिप्तता पण मना भुरळ घालते
वाट नसलेली वाट साद जीवनास देते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा