शनिवार, ३१ मार्च, २०१८

तीच वाट


तीच वाट
******

तीच वाट 
तीच पहाट 
तीच आहट 
गोठलेली 

मी माझ्यात 
मी जगण्यात 
मी असण्यात 
मांडलेली

माझे असणे 
माझे नसणे 
माझे कळणे 
तुझ्यामुळे 

थोडा ताप 
थोडा शाप 
थोडा उ:शाप
काही इथे 

तोच गोंधळ 
तीच खळबळ 
तेच पोकळ 
शून्य भरे 

कळल्या विन मी
वळल्या विन मी 
जळल्या विन मी 
चितेवरीं


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ३० मार्च, २०१८

दत्त एक स्वप्न




दत्त एक स्वप्न

दत्त एक स्वप्न
निद्रेला गिळून
अस्तित्वा भरून
उरलेले ||

दत्त एक सत्य
विश्वाला गाळून
काळाला सारून
थांबलेले ||

दत्त एक जगणे
श्वासात भरून
हृदयात येवून
वसलेले ||

दत्त एक प्रार्थना
अवघे सुटून
एकटे उरून
उमटलेली ||

दत्त एक साधन
श्रद्धेत रुजून
शरण होवून
अंगिकारले ||

कृपे वाचूनिया
दत्तास कळणे
कदापि घडणे
नाही नाही ||

म्हणून विक्रांत
मीपण सोडून
उगाच पडून
दत्तपदी ||

डों.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २८ मार्च, २०१८

उधारी


उधारी

गर्द गूढ निळ्या रात्री
घेऊनिया डोह गात्री
माथ्यावरी चंद्र दावी
खुळी स्वप्ने जरतारी

फाटलेले ओठ अन
गाणे उलतेच उरी
तो सुखाचा सोस जून
स्वप्न मानतोच खरी

वेडी फुंकर कुणाची
वेदनांना डिवचते
जाळ रक्तातील तप्त
श्वास शून्य पेटवते

तम देही कोंडलेला
पेशीपेशी हतबल
तीच व्यर्थ कवाईत
तोच चालतोय खेळ

दिवसांची ही उधारी
आता पेलवत नाही
नि सुखाचे उखाणेही
या मना सुटत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २४ मार्च, २०१८

धरिला ध्यास





धरिला ध्यास  

दाटले आभाळ
अभ्राचा प्रवास
परी ते आकाश
गतीविना ||१||

ऐसे माझे मन
करी दयाघन
धाव स्थिरावून
पवनाची ||२||

अंतरी अथांग
हृदय आकाश
पवनाचा ऱ्हास
होवो तिथे ||३||

धरिला हा ध्यास  
पुरा करी देवा
विक्रांतास ठेवा
हाची द्यावा ||४||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २० मार्च, २०१८

स्वामी देव माझा


स्वामी देव माझा 

देव माझा देव माझा 
देव माझा रे 
स्वामी देव माझा रे
समर्थ देव माझा रे 

अक्कलकोटी 
अक्कलकोटी 
राहत आहे रे 
मजला पाहत आहे रे 
सांभाळत आहे रे 

जनी वनी घरी दारी 
घेऊन या कडेवरी 
मजला नेत आहे रे 
सदैव सोबत आहे रे 

रागावून बळे कधी 
जोजारून बळे कधी 
सांगत भक्ती आहे रे
भरवत घास आहे रे

हिंडे फिंडे उंडारे मी 
अडे कुठे भटके मी 
ठेवीत ध्यान आहे रे 
आणत मार्गी आहे रे 

पडतो मी घडतो मी
पुन्हा पुन्हा रडतो मी  
हरतो मी चिडतो मी 
सदा सावरत आहे रे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १७ मार्च, २०१८

दुरावल्या मितास



दुरावल्या मितास
*************

नशिबाने कधीकधी
मित असे मिळतात
न मागता जीवनात
स्वर्ग जे फुलवतात ।

कळत नकळत जे
जिवलगही होतात
तरी का न कश्याने
दूरावलेही जातात ।

काही गैरसमज वा
संशय काही येतात
मैत्रीलाच मैत्रीचे ते
ओझे मानून जातात  ।

त्यांचे जीवनात येणे
जीवन उमलून जाणे
परी कथेहून जणू
असते लोभसवाणे ।

त्याचे निरपेक्ष देणे
जणू वरदान होते
त्याचे सोडून जाणे
प्राप्त प्रारब्ध ठरते ।

मिळता मित म्हणून
सोबत असे तोवर
हा माझा वेडा जीव मी
ओवळतो त्याच्यावर ।

अन गेला दूर जरी
मनी दुवा उमटतो
सदा रहा सुखी यार
आयुष्य तया मागतो ।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

भाग्य माझे (नर्मदाकाठच्या कविता)



भाग्य माझे (नर्मदाकाठच्या कविता)


काखेमध्ये झोळी
हातात या काठी
नर्मदेच्या तटी
चालतो मी ॥

एकेक पाउली
नर्मदा गजरी
पातकांची सारी
पळे सेना ॥

माईच्या कुशीत
सुखाची पहाट
घरे काठोकाठ
समाधान ॥

अहो भाग्य जणू
जहाले प्रसन्न
घडले दर्शन
मैयेचे हे ॥

इथल्या किनारी
थांबावे वाहणे
घडावे चालणे
विक्रांतचे ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १३ मार्च, २०१८

एक घोटाळा



एक घोटाळा
🙄🙄🙄🙄
एकच फक्त
भारी घोटाळा
मजला इथे
करता यावा
😀😀😀😀
कुणा कुणाला
कळल्याविना
नवसा माझ्या
देव पावावा
🤗🤗🤗🤗
एका करोड
मध्ये असती
शुन्य किती ते
माहीत नाही
🤔🤔🤔🤔🤔
असे हजारो
म्हणजे किती
वेड्यागतच
होतय काही
 😅😄😆,😍
कुणा हवीय
ढोर मेहनत
उगा कष्टणे
रक्त जाळत
🤓🤓🤓🤓
कढण्याआधी
हळूच घ्यावा
लोणी गोळाच
संधी साधत
😉😉😉😉
देतील शिव्या
त्या देऊ द्यावे
नाव गाव ते
कुणास हवे
😇😇😇😇
येथ दिव्य जे
शिकले क्लुप्त्या
त्या गुरूदेवा
सदा नमावे,,?
,😎😎😎😎
,😂😂😁😁

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १२ मार्च, २०१८

पाहुणा



पाहुणा


मिटलेल्या पापणीत
जगण्याच्या वाटा साऱ्या
वेड्या पदा खुणावती
गिरनारच्या पायऱ्या ॥


गोपीचंदनाचा टिळा
माळ तुळशी टपोरी
माझी ज्ञानोबा माऊली
ओढ लागली अंतरी ॥


कसे थांबवू प्राणास
देही असोनि विदेही
सवे चालतोय काळ
मज भान ते हि नाही ॥


झालो चंदनी बाबुळ
सारे अर्पीतो धुनीला
घेई लपेटून मला
वर्ण सुवर्ण देहाला ॥


जगा दिसतो विक्रांत
खेळ चालला जन्माचा
झालो पाहुणा कधीच
मी या राहत्या घराचा ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

वय वाढता

वय वाढता 

आपण मोठे होतो 
म्हणजे काय होते 
हे देहाचे यंत्र 
फक्त थोडे जुने होते 
पण या मनाचे खळखळणे 
कधीच थांबत नसते
आणि आपल्या आतील 
ते अनुभवने 
अजूनही चालू असते 

ती मंद हवेची थंड लहर 
तो ओल्या मातीचा सुवास 
निळ्या नभातील टपोरा चंद्र 
अगणित उल्कांची आरास 

आंब्याचा मोहोर 
प्राजक्ताचा सडा 
सागाराची गाज 
सुर्यास्ताचा साज

देवळातील कीर्तन 
वासुदेवाचे भजन 
चिवचिव णारा पक्षी
फुलांची नक्षी

या आणि अशा कितीतरी गोष्टी 
जोवर जुन्या होत नाहीत 
तोवर आपण राहतो 
ते तसेच षोडशीचे चिरतरुण

विस्फारलेल्या नजरेचे  
सुखाने बहरुन आलेले
आनंदाने फुलून गेलेले 
जीवन होवून 

या जगातील गंध 
मला बेहोश करतात 
या जगातील रंग 
मला हरवून टाकतात 
या जगातील स्वाद 
मला ओढत नेतात 
त्यांचा त्याग करायचा 
विचारही माझ्या मनात 
येत नाही कधी 

या तृप्त आणि अनेक अतृप्त 
आकांक्षा इच्छा आणि स्वप्न 
घेऊन मी जगत आहे 
हे ऊन सावलीचे जगणे 
किती सुंदर आहे 

हे मला असलेले 
माझ्या जगण्याचे भान 
याहून सुंदर काही असेल 
असे खरेच मला वाट त नाही.

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, ४ मार्च, २०१८

ज्ञानदेवा !!

ज्ञानदेवा!

तुझ्या समाधीवर  
जावे माझे प्राण
हेच असे मागण  
ज्ञानदेवा ॥

जाणीव नेणीव
व्हावी तदाकार
सरून आकार
जगताचा ॥

तोवर जगणे
तुझिया स्मृतीत
राहावे घडत
हवे तर ॥

तुझे गुणगाण
रूपाचे स्मरण
नामाचे चिंतन
घडो सदा ॥

तूच पांडुरंग
दत्त दया घन
विक्रांत जाणून
पदी जडे ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ३ मार्च, २०१८

अजित चिंतामणी मित्र माझा



अजित चिंतामणी यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली कविता ३.३.१८


पोलादी मनाचा
दिलदार हृदयाचा
कर्तव्यी वज्राचा
मित्र माझा ॥


व्यवहारी जगाचा
संसारी कुटुंबाचा
अंतरी निष्ठेचा
बुलंदी जो ॥


राखेत हरवला
फिनिक्स उठला
डोळ्यांनी पाहिला
तो हाच मी ॥


अजित नाव जे
सार्थक जयाचे
सात्विक यशाचे
निधान जे


आयुरारोग्य राहो
प्रभु प्रेम जागो
समाधान लाभो
सदा तुला


जुनाट मैत्रीचा
धागा हा मनाचा
विक्रांत सदाचा
हाती राहो ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...