पाहुणा
मिटलेल्या पापणीत
जगण्याच्या वाटा साऱ्या
वेड्या पदा खुणावती
गिरनारच्या पायऱ्या ॥
गोपीचंदनाचा टिळा
माळ तुळशी टपोरी
माझी ज्ञानोबा माऊली
ओढ लागली अंतरी ॥
कसे थांबवू प्राणास
देही असोनि विदेही
सवे चालतोय काळ
मज भान ते हि नाही ॥
झालो चंदनी बाबुळ
सारे अर्पीतो धुनीला
घेई लपेटून मला
वर्ण सुवर्ण देहाला ॥
जगा दिसतो विक्रांत
खेळ चालला जन्माचा
झालो पाहुणा कधीच
मी या राहत्या घराचा ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा