शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

राधातत्व


राधातत्व
*******
राधा न कळते केल्याविना प्रीती
राधे विन भक्ती 
फोल सारी ॥१
फोल सारे जन्म कृष्ण राया विन 
जन्माला येऊन 
वाया जाणे ॥२
वाया जाते धन यश कीर्ती मान 
काळात वाहून
क्षणात रे ॥३
क्षणोक्षणी प्रीत कर साऱ्यावर 
जीव जीवावर 
ओवाळ रे ॥४
ओवाळून अहं प्रेमात टाकता 
ठसेल हे चित्ता 
राधा तत्व ॥५
राधेची करुणा भक्ती ये जीवना 
मग भेटे कान्हा 
वृंदावनी ॥६
विक्रांत मागतो राधा राणी सदा 
ठेवी मज पदा 
तुझ्या माय ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

डॉ.पाष्टे सर


डॉ . पाष्टे सर 
************
बीएमसी का चालते ?
राज्य सरकार का काम करते ?
सीएमएस ऑफिस का चमकते ?
याचे उत्तर एकच आहे 
ते म्हणजे पाष्टेसारखी माणसं आहेत म्हणून 
खरंच पाष्टे सर अशा माणसातीलही दुर्मिळ माणूस आहे .
त्याचे असणे इतरांसाठी वरदान अन आधार आहे 

बहुतेक माणसं केवळ स्वतःच्या  विचार करून जगतात
पण स्वतःबरोबरच इतरांचेही भले व्हावे  
असे वाटणे आणि त्यासाठी झटणे .
ही माणसातील मानव्याची खूण आहे 
डॉ. पाष्टेची काम करण्याची पद्धत तशीच आहे .

आपण काम करत असलेली संस्था 
रुग्णालय आपले सहकारी कर्मचारी 
आणि सेवा घेणारे रुग्ण 
या सगळ्याबद्दल प्रेम  असलेला,
अपार अनुकंपा असलेला 
आणि त्यापोटी प्रचंड काम करणारा 
हा भला माणूस आहे.

ते कामही उगाचच वरवरचे नाही 
दिवस भरणे नाही तर 
त्या कामात जीव ओतणे ते काम सुंदर करणे 
हे त्याचे स्वरूप आहे
हा खराखुरा कर्मयोग आहे 
आणि हा कर्मयोग साधने त्याना जमले आहे.
त्यासाठी त्याना वेगळा प्रयत्न करावा लागला नाही 
तर ते त्यांचा अंगभूत स्वभाव आहे 

खरंच हे रसायनच विलक्षण आहे 

त्याला मेडिसिन खूप चांगले येते 
कॉम्प्युटर तर उत्तमच येतो 
तो उत्तम सांख्यिकी आहे 
तो बोलण्यात पटाईत आहे .
कुठलेही उत्तर ड्राफ्ट प्रपोजल तारांकित प्रश्न
क्षणार्धात तयार करू शकणारा 
हा भाषा प्रभू आहे .
प्रशासकीय शब्दावर आणि भाषेवर 
त्याची हुकूमत वादातीत आहे 
प्रश्नाचा आवाका उत्तराचा विस्तार 
त्यातील नेमकी आकडेवारी 
त्याचे गणित  पाष्टे च्या डोक्यात
प्रश्न बघताच होत असते 

याशिवाय प्रचंड विनम्रता अंगीभुत असलेला, 
तरीही वेळप्रसंगी रागवणारा पण 
तो राग पोटात न ठेवणारा 
हा सहदयी माणूस आहे 
त्याला कामचुकारपणा करणारे लोक
आवडत नाहीत 
त्याच्याबरोबर त्याचे पटत नाही 
त्याना वाटते सगळ्यांनी त्याच्यासारखे 
झडझडून कामाला लागावे
तसे होत नसते 
सारेच प्रमोद पष्टे नसतात ना !
मग थोडे वितुष्ट येते 
पण साहेबांना त्याची पर्वा नसते
सूर्याने प्रकाशलेच पाहिजे 
तार्‍यांनी चमकलेच पाहिजे 
प्रत्येकाने आपले कर्तव्य केलेच पाहिजे 
हे त्यांचें ठाम मत आहे
ते त्यांनी स्वतः अंगी बाणलेले तत्व आहे 

बीएमसीची  कार्यपद्धती 
अन त्या कार्यपद्धतीच्या मर्यादा 
त्यात अंगभूत असलेली कठोरता 
बेपर्वाई ढिलाई आणि उद्दामता
याचे संपूर्ण भान असूनही 
त्यावर मात करण्याचे सर्व प्रयत्न त्यांनी केले 
आणि अनेकदा अश्या प्रयत्नात 
अनेक प्रकल्पात त्यांनी खूप यशही मिळवले 
कातळ फुटेल तेव्हा फुटेल  पण 
घाव मारणे सोडणे नाही 
हे त्यांचे एक महत्त्वाचे सूत्र होते 

पाष्टे खूपच चांगला मित्र आहे 
खूपच चांगला सहकारी आहे 
पण तो खूप चांगला पती 
आणि पिताही आहे 
हे त्यांच्या घरच्याशी होणाऱ्या संभाषणातून 
त्यांच्या काही उद्गारातून 
आणि धावपळीतून 
सहजच लक्षात येत होते . 
 
एकाच वेळी एवढी सारे चांगले गुण 
एका माणसात कसे असू शकतात 
असा प्रश्न अनेकांना पडतो 
त्याबाबतीत पाष्टे सर भाग्यवंत आहेत 
मला मात्र त्यांच्या अनेक गुणापैकी 
एक गुण सगळ्यात आवडतो 
तो म्हणजे त्यांचा वैयक्तिक जीवनातील
अन कामातील स्वच्छता सुरेखता
टापटीपणा आटोपशीरपणा
त्यांचे कामातील नियोजन आलेखन
याची साक्ष देतात .

त्याशिवाय त्यांची आपल्या कामावरती 
असलेली निष्ठा 
आपल्या वरिष्ठा बद्दल असलेला आदर 
हा वादातीत आहे 
सी एम एस पदा वरील डॉ.मलिक मॅडम पासून 
 डॉ.ठाकूर मॅडम पर्यंतच्या सर्व सीएमएसला  
पाष्टे सरांनी  काम करतांना पाहिले 
आणि प्रत्येकाला आपल्या निष्ठेचा प्रत्यय दिला .
त्या खुर्चीचा त्यांनी कधीही अनादर केला नाही 
किंवा त्याला कमीपणा येईल 
अशी कुठलीही कृती केली नाही 
ते पद अधिकाधिक शक्तिशाली व महत्त्वाचे कसे होईल 
 याची जमीन काळजी वाहिली .

माझ्या मते सीएमएस हे प्रेसिडेंट तर 
पाष्टे सर सीएमएस ऑफीसचे पंतप्रधान होते . .

वर मुक्तछंदात केलेला गुणांचा सारांश असा
करता येईल की 

हा माणूस अपार गुणांचा 
असे दिलदार मनाचा ॥
हा माणूस अनंत ध्यासाचा 
वसा याचा कामाचा ॥
हा माणूस खंबीर निष्ठेचा 
झरा पोटी चांगुलीकीचा "
हा माणूस प्रगाढ मैत्रीचा 
जीव जीवाला द्यावयाचा ॥
हा माणूस मधाळ गोडीचा 
पाणी भरल्या शहाळ्याचा ॥
हा माणूस अवघा प्रेमाचा 
हृदयी सदैव ठेवायचा ॥
हा माणूस आईचा साईचा 
दत्तप्रभूच्या कृपेचा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

कळ

कळ
*****
दत्ता काळजाची कळ  
माझ्या मिटत नाही रे 
तुज पाहण्याची ओढ 
बघ सरत नाही रे ॥ १

जरी सरू सरू आली 
माझी मांडलेली कथा 
तुज भेटल्या वाचून 
नच मिटणार कदा ॥ २

तुझा स्पर्श जीवनाला  
सांग होणार तो कधी
सार्थकता जगण्याची
चित्ती भरणार कधी ॥ ३

आता उमटत नाही 
शब्द हरवले सारे 
घेई समजून माझे 
तूच खुळे हे इशारे ॥५

व्हावा विक्रांत निशब्द 
महा शून्यात तुझिया
उगा उठला तरंग ।
जावा जाणून विलया ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

साठी



साठी 
******
जरी साठी आली गाठी 
नाही आठी कपाळाला ॥१

कधी व्यथा पाठी पोटी 
नाही चित्ती आटाआटी ॥२

आले ऋण गेले ऋण 
हाती धन ठणठण ॥३

छान पैकी जगलो की
अहो नवकी शंका नाही ॥४

मनी गाणी मित्र जनी
शत्रु कुणी सुद्धा नाही ॥५

अन ऐक बात पक्की
वजाबाकी कुठे नाही ॥६

तर मग माझे जग
तगमग शुन्य पाही ॥७

जगण्यात सदोदीत
हा विक्रांत मस्त राही॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .


रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

ॐ कार तू

  ॐ कार तू
********

निराकारी उमटला संपूर्ण स्वयंभू आकार तू         
मिती आली जन्माला विश्वसंकल्प साकार तू

महास्फोटा आधीची अनाकलनीय उर्जा तू 
नेणिवेचा अथांग सागर जाणीवेचा गर्भ तू 

ज्ञानाची सीमा पुसली चक्रावणारा अनंत तू  
विज्ञानाची घुसळण इवली सर्वदा अस्पर्श तू 

थकली बुद्धी ठकला विचार अगणित अपार तू 
माझ्या मनी सजविलेला ज्ञानेशाचा ॐ कार तू

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/

सुख

ऋतुराज 
****
सुखाचा धबाबा होतसे वर्षाव 
आनंदाचा गाव
भेटी आला, ॥१
इवल्या क्षणाचे झाले महायुग
आटुनिया जग
मनी गेले ॥२
कशाला बोलणे शब्द आता उगे
स्वरूपात जागे
तुझे पण ॥३
अवघे कोंदाटे तुझेेेच असणे 
माझे हे पाहणे
मंत्रमुग्ध ॥४
फिरे मोरपीस तनमनावर
जागेपणावर
स्वप्न भास ॥५
विक्रांत धुमारे आनंद फांदीला
आला रे भेटीला
ऋतुराज ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

वरदान


वरदान
******
तू उधळलीस 
सुमने काही
माझ्यासाठी 
माझी नसूनही 

त्या गंधाने 
त्या रंगाने 
झालो बेभान 
मृगासमान 

नाभीमधला 
दडला प्राण 
श्वासात भरून
आलो उधळून 

माझे मजला
कळल्या वाचून
जणू की होवून
आनंद रान 

आता  रंग ते
आणिक गंध 
झाले आहेत 
प्राण तरंग

तुझे हात अन
दैवी वरदान 
करती शिंपण
स्पर्शामधून

अनुभूतीच्या 
आकाशातून
साक्ष देतात
साथी होवून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

आरती


आरती
******
खणाणती टाळ सुर ठरलेले 
शब्द रुळलेले ओठी जरी ॥१

परि भाव नवे मनी क्षणोक्षणी 
चाले ओवाळणी आरतीची ॥२

तीच ती प्रार्थना सुखाची याचना 
मागताना मना लाज नाही ॥३

हे तो असे एक आनंदाचे गाणे 
जीवना भेटणे जीवनाने ॥४

देव भक्ता पडे देहाविन मिठी 
रेशमाच्या गाठी अंतरात ॥५

विक्रांत पेटली ज्योत अंतरात 
रोम रोमी दाट तेज फाके ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

गणेश रूप

 रूप
****
पाहता सुंदर रूप मनोहर
हर्ष अनिवार मनी दाटे ॥
लोभस साजरी मूर्ती गणेशाची 
बटू बालकाची कांतीमान ॥
शुभ्र मोत्यासम असे एकदंत 
कृपा वक्रतुंड मुखावरी ॥
निळसर शेला पीत पितांबर 
लेणी देहावर सुवर्णाची ॥
कटीसी मेखला हातात कंकण 
पायात पैंजण रुणझुण ॥
योगिया दुर्लभ भक्तासी सुलभ 
प्रेमाचे वालभ मुर्त असे ॥
रूप पाहूनिया हरपले भान 
मन झाले लीन पायी तया ॥
विक्रांत हृदयी नित्य विनायक 
पाहतो कौतुक भक्तीचे हे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

प्रतिमा

प्रतिमा
******
पुन्हा पुन्हा माझ्या मनात 
तुझ्या प्रतिमा उमलती 
सारेच दिवस पुनवेचे 
होत सागरा येते भरती ॥

पुन्हा एकदा जीवनाला 
जगण्याची येते उर्मी 
होता वर्षा स्पर्श जैसा 
सुखावते पुन्हा भूमी ॥

जाणतो मी दूरवर तू 
लागणार नाहीच हाती 
नील नभापलीकडे त्या 
तुझी दुनिया प्रिय वस्ती ॥

गीत तुझे ओठात माझ्या 
सुर जेव्हा होऊन येतात 
त्या सुखाच्या वादळात 
हरवतो मी तुझ्या रूपात ॥

तुझेपणाचे अथांग वेड हे
घेवूनी मी असा माझ्यात 
साद घालतो भान हरवून 
ये रे ये तू माझ्या हृदयात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .



मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

आला गणपती


आला गणपती
************
आला गणपती आला गुणपती 
आला महामती विद्येचा तो ॥१
आला मिरवत वाद्य गजरात 
बसे मखरात सजलेल्या ॥२
झाली रोषणाई चढली झिलई 
अवघीच घाई घरी दारी ॥३
भरले बाजार पेढे फळे हार 
चालला व्यापार धामधुम ॥४
जमा झाले गावी अवघे ते भाई
भेटीगाठी जीवी जिवापाड ॥५
सज्ज सुगरणी सज्ज सुहासिनी 
पहा कौतुकानी रूप ल्याले ॥६
होतेसे गजर टाळांचा अपार 
गुलाल भुवर विखुरला ॥७
रांगोळ्याची नक्षी मिरवती दारे 
फटाके भूर्नळे हर्ष फुटे ॥ ८
गल्ली  बोळामध्ये मांडले मांडव
विराजित देव थोर तिथे ॥९
अन तयाचा तो वेगळाच थाट 
आरास अफाट मांडलेली ॥१०
 अनंत मूर्तीत एकच तो देव 
डोळीयात भाव प्रेममय ॥११
आता दहा दिस चालू दे दंगल
 नभात मंगल तेज कोंडो ॥१२
विक्रांत आनंद मनात दाटला 
विश्वात भरला ओसंडून ॥१३

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

वेध


वेध
***"
पुन्हा तुझा वेध लागे दत्तात्रेया
यावेसे भेटाया मज वाटे ॥
काय मी चालेल पायरी चढेल 
तुजला भेटेल पुन्हा देवा ॥
तुच बळ देता मज चालविता 
कर्ता करविता जाणतो मी ॥
सांभाळ दयाळा पुन्हा एक वेळा 
भेटीचा जिव्हाळा  देई मज ॥
जरी अंगी नाही पुण्याचा तो लेश
भक्तीचा आवेश बळे आणी ॥
गुणात  वाहतो मूढ अल्पमती 
ठेवियले चित्ती परी तुज ॥
आता तार मार बोलाव वा टाळ 
विक्रांत केवळ तुझ्यासाठी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

निभावणे

.निभावणे
********
आताही वाऱ्याचा झोत आला की 
झाड हिंदोळत आहे थरथरत आहे 
कधी फुलांची बरसात खाली करत आहे
तर कधी फळेही घरंगळत आहेत
ते झाड आनंदाचा वर्षाव करत आहेत 
पण वाऱ्याच्या झोतावर भूमीला स्पर्शणारे 
आणि स्वतःभोवतीच रिंगण घालणारे 
त्याचे ते अल्लड पण आता ओसरले आहे 
आता फांदीवर घर केलेल्या पक्षांची 
आणि पिलांची काळजी त्याला वाटत आहे 
रोज आशेने येणाऱ्या पांथस्थाची
कदर त्याला आहे 
तशी अजूनही वाऱ्याची सलगी त्याला आवडते 
पण आता त्याला वादळाची अन 
वावटळीची भीतीही वाटते 
म्हणून मग त्याची मूळे अधिकच 
खोल खोलवर जात आहेत 
आता उन्मळून पडणे त्याला परवडणार नाही
त्याला त्याचे वृक्षपण निभावायचे आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

दत्त घर

दत्त घर
******
दत्ताच्या घरात बसावे निवांत 
ऐसे या मनात 
बहू येते ॥१
परि त्या घराचे दार ना दिसते 
कुठून कुठे ते 
जायचे रे ॥२
कोण उघडेल कधी उघडेल 
मजला नेईल 
आत कैसे ॥३
विक्रांत यत्नाचे पाय मोडलेले 
पंख तुटलेले 
आपटून ॥४
भरून प्रतीक्षा ऐसी कणोकणी 
राहतो पडुनी 
पथी तया ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

स्वामी

स्वामी
******
तुच नाथ तुच दत्त     
स्वामी माझा अवधूत ॥
तुच शाक्त गाणपत्त्य    
स्वामी माझा अवधूत ॥
तुच शैव भागवत       
स्वामी माझा अवधूत ॥
तुच बुद्ध तथागत     
 स्वामी माझा अवधूत ॥
तुच देव तुच भक्त      
स्वामी माझा अवधूत ॥
माझे हृदी सदास्थित  
स्वामी माझा अवधूत ॥
कृतकृत्य हा विक्रांत   
स्वामी माझा अवधुत ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

बोलणे

बोलणे
******
काय बोलले जाते ते खरंच महत्त्वाचे नसते 
कोण सोबत बोलते तेच महत्त्वाचे असते .
बोलणे तर कुठल्याही अवांतर विषयांवर होते
कितीही अन कुठलेही विषयांतर घडू शकते 
घटना सांगितल्या जातात प्रसंग वर्णिले जातात
टेबल खुर्ची मिरचीमसाला काहीही बोललेजातात 
विषयात आपण नसतो शब्दातही आपण नसतो 
शब्द उमटल्या मनाच्या सहवासात आपणअसतो 
आणि ते मन असते मैत्री प्रदान करणारे 
आपल्या अस्तित्वातील अनेक शून्य भरणारे 
ते बोल असतात स्थैर्य आणि धैर्य देणारे 
जीवनाच्या माळरानावर आपुलकीची उब देणारे 
आणि तो काळ असतो निर्विवादपणे दुःख वर्जीत 
आपण जगत असतो आपल्या मोहरल्या अस्तित्वात 
मैत्रीचे सौख्याचे प्रेमाचे असे झाड जीवनात उगवते 
भावनांच्या वैभवाने बहरते ही खरंच जीवनाची कृपा असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

आवेग

आवेग
******
जेव्हा सरतात आवेग 
कोसळणाऱ्या प्रपाताचे 
अन वाहते पाणी 
रूप घेत प्रवाहाचे 
तेव्हाही ते जीवनच असते 

हृदयातील प्रत्येक आवेग 
हा असाच झोकून देतो स्वतःला 
उंचावरून खाली 
परिणामाची चिंता न करता 
अन हरवतो 
स्पर्शताच जमिनीला वास्तवाला 
म्हणूनच ते जीवन असते 

आवेगाचा छंद नेतच राहतो 
मनाला खेचून पुन्हा पुन्हा 
नवनव्या उतारांकडे 
नवनव्या तटाकडे 
आणि राहतो कोसळत 
जगण्यामध्ये झिंगत 
सागराला मिळेपर्यंत 
म्हणून जीवन सुंदर असते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 


सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

स्वप्न


जीवन
****

जेव्हा हरवतील तुझी स्वप्न 
आणि जागेपणात होरपळेल जगणं
तेव्हा नकोस देऊ तू दोष कुणाला
स्वतःला तिला अथवा जगण्याला
किंवा त्या खुळ्या स्वप्नाला
तुझे जीवन अथवा त्याचे जीवन
तुझे स्वप्न आणि त्याचे स्वप्न 
सगळी सारखीच असतात 
चेहरे बदलतात देह बदलतात 
मन तशीच असतात 
नदी बदलते पाणी बदलते पण 
वलय तशीच असतात 
थोडक्यात तुझे स्वतःचे इथे काहीच नसते 
ना सुख असते ना दुःख असते 
सुखदुःखात हिंदकळणारे मनही तुझे नसते 
इथे केवळ जीवन असते 
जगण्याच्या नाट्याला पार्श्वभूमी प्रदान करणारे 
तुझा प्रवेश त्याने ठरवून ठरवलेला असतो 
आणि तुझे गंतव्य सुद्धा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

सुंभ

सुंभ
****
मिटल्या मनात मिटले चांदणे
मिटलेले गाणे एक तुझे ॥
तुज भेटायचे तुज जाणण्याचे
हृदी ठेवण्याचे भाग्य उणे ॥
तरीही जगणे रेटतेच पुढे
पाठीवर कोढे प्राक्तनाचे ॥
होय निपचित जाणीव लाचार 
काय अंतपार तया नाही ॥
परि मिटते ना वेड सरते ना 
स्वप्न मिटते ना तुझे तेच ॥
विक्रांत जळता सुंभ क्षणोक्षणी 
वेदना घेऊनी कणोकणी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

आधार

आधार
*******
अवघ्या जगता 
देतसे आधार 
गुरु कृपा कर 
दत्तात्रेय ॥१
चालवतो पथी 
धरूनिया हाती 
साधनेची रिती 
दाखवतो ॥२
हात सुटताच 
गती खुंटताच 
धाव घे स्वतःच 
भक्तासाठी ॥३
विक्रांत मनात 
संदेह तो नाही 
दत्त जैसा नेर्ड 
तैसा जाई ॥४ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 
ज्वालामुखी (रूपक)
*********
धुमसतो ज्वालामुखी उंच त्या शिखरावर
वाहे लाव्हा येतो धूर रूप असे घनघोर 

पान पान जळू गेले रान सारे मरू गेले
जाणिवेच्या हुंकारात गाव नामशेष झाले 

भय फार पाखरांना त्राण जाई उडतांना 
दुमदुमे  भयनाद फळ कुण्या कामनांना 

अंतरात कोंडलेला किती खोल असे जाळ
 ठाऊक न उलटला किती युगे युगे काळ 

पुन्हा एक जाग येता तोच तप्त वेगावेग
आणि नभी उलटते एक दैवी गोल रेघ 

थरारत्या स्मरणात हादरतो कणकण 
उठूनिया लोपतसे सनातन जागरण ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

म्हातारपण

म्हातारपण
********

कुणालाही कधी काही मागू नये 
अन् म्हातारे झाल्यावर 
कुणावरही अवलंबून राहू नये 
चांगली असतील मुले तर ठीक आहे 
नाही तर आपणच आपली वाट 
वेगळी केलेली बरे
चार पैसे गाठीला ठेवलेले 
तर कधीही चांगली असते 
आपल्या बचतीत कुठलेतरी 
वृद्धाश्रमात शोधून सुखात जगणे 
हे सुद्धा चांगलेच असते 

प्रिय असतात नातलग अन्
सांभाळतात मुले नातवंडे
अहो भाग्य नाही या परते 
पण सगळेच काही 
एवढे नशीबवान नसतात 
वृद्धाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम 
त्यांच्यासाठीच असतात
तिथे जगावे मस्त आनंदात 
नवनवे मित्र जमवत 
नवनव्या गोष्टी शिकत 
नवीन छंद जोपासत 
राहावे सदैव वाहत गंगेगत 
मागील सारे किनारे विसरत 

मला सांभाळा रे 
अशी  अर्ज आर्जवे नकोत 
सांभाळत नाही म्हणून 
शिव्या शापही नकोत 
मुले जन्माला येतात ती
आपल्या आणि त्यांच्या प्रारब्धाने 
पुरे करण्यास काही मागील देणे घेणे
तर मग जे वाट्याला आले 
ते भोगणे क्रमप्रात आहे

अपेक्षात अडकणे म्हणजे 
संसारात अडकणे आणि 
संसारात अडकणे म्हणजे 
जन्मा मरणाच्या चक्रात अडकण
म्हणून सर्व अपेक्षांचा अंत जिथे होतो 
त्या भक्तीसागरात स्वतःला लोटून देणे 
किंवा कर्मयोगाचा कर्तव्याचा पथ पकडून
त्या मार्गाने चालत राहणे 
हेच तर अध्यात्मात शिकणे असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

प्रियतम

प्रियतम
******
तुझिया शब्दाची भूल मनावर 
प्रीत खोलवर रुजलेली ॥
तुझ्या स्मिताची मधु उधळण 
वेचता वेचून सरती ना ॥
तुझे ते पाहणे डोळे उजळून 
मन हरखून खुळे होते ॥
तुझिया स्पर्शात चैतन्य चांदणे 
देह होतो गाणे सुरावले ॥
तव परिमळ धुंद चंदनाचा 
कस्तुरी उटीचा विश्वाकार ॥
इंद्रिया वेढून नेशी पलीकडे 
प्रियतम कोडे जीवीचे तू ॥
तुझिया ध्यानात नावात प्रेमात 
जीवन वाहत राहो सारे ॥
पुनः पुन्हा घ्यावा जन्म तुझ्यासाठी 
तुजविण चित्ती नको अन्य ॥
आनंद विभोर होय कणकण 
तुजला स्मरण करताच ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

महाडच्या पोरेबाई( शिक्षक दिनानिमित्त)

महाडच्या पोरेबाई( शिक्षक दिनानिमित्त)
**************

महाडच्या एक नंबरच्या दगडी शाळेत 
अहमदनगरच्या खेडवळ तालुक्यातून  
आलेला तो तिसरीला पोरगा 
काळेला गावंढळ बरचसा हडकुळा 
प्रचंड अशुद्ध बोलणारा न व ण न कळणारा 
कुठलीही रितभात न पाळणारा 
पण चौकस नजरेचा हपापून जग बघणारा  दिसणारे सारे डोळ्यात साठवणारा
 शाळेत आला की व्हायचा एकदम बुजरा 
त्याला मिळाला एकच मित्र 
तोही त्याच्यासारखा नवीन पण बडबडा 
अन् पक्का कोकणी 
त्याचा एकमेव आधार
बऱ्याच  दांड्या मारणारा 
बाकी साऱ्याकडून  वाळीत टाकल्यागत 
तो  असायचा मागे बसत 
एकटा एकटा 
शाळा सुटायची वाट पाहत 
टारगट पोराकडून उगाचच मार खात 
..**
तिसरीतल्या बाई तर लक्ष द्यायचा नाहीत 
त्या काय शिकवतात काय नाही 
कुणास माहिती 
त्याच्या डोक्यात काही शिरायचेच नाही 
त्यांच्या डोळ्यातील तुच्छता दुर्लक्ष 
त्याला काही ग्रहणच करू द्यायची नाही 

सगळे जग धूसर होते 
आणि दिवस भरभर उलटत होते 
एका बागेतून उपटून 
दुसऱ्या बागेत लावावे तसे
रोप मरगळलेले होते
ते थांबलेले थबकलेले जीवन होते 
जरी जीव धरत होता मुळे पसरत होती 
पण अस्तित्व तसेच होते 
 न वाढणारे न फुलणारे
जगणे झाले होते गारगोटीगत 
थंड निष्क्रिय निस्तेज सर्वसामान्य 
**
अन्  तेव्हाच जीवनात आल्या पोरेबाई 
रत्नपारखी नजर घेऊन 
आणि त्यांनी घेतले त्याला जवळ ओढून 
अचानक महत्त्व देऊन वाहवा करून 
गुणाचे कौतुक करून 
त्यांच्या त्या आश्वासक शब्दांनी 
आणि दिलेल्या आधाराने 
हरवला अंधार विरघळली उदासीनता 
भेटला दिलासा पेटला दिवा 
अन जमू लागले सभोवती मित्र मैत्रीत्सुक
करू लागले हुशार मुले स्पर्धा त्याच्याशी 
तो कधी येऊन बसला पहिल्या रांगेत 
त्याला कळले सुद्धा  नाही
ते एक वर्ष सारे जीवन बदलणारे
पंख देणारे उडायला शिकवणारे
होते उमलून आणणारे
आणि त्यानंतर 
सदैव तळपणारी स्वत्वाची जाणीव 
कधीही न विझणारी स्वाभिमानाची  ज्योत 
राहिली अखंड अविरत तेवत
ते झाड तगले जगले वाढले 
स्वतःचा आकार घेऊन फुलाफळांनी बहरले 
****
पण ती माळीन 
कदाचित गेली असेल तेव्हाच त्याला विसरून 
आणि आता कदाचित हे जगही सोडून 
खूपदा ठरवूनही मनात लाखदा पुजुनही
 नाही जमले त्याला त्यांना प्रत्यक्ष भेटायला 
भीती वाटत होती त्याला 
कदाचित त्यांनी ओळखलं नाही तर 
खरंतर त्याने फारसा फरक पडला नसता 
वर्षा आली होती ऋतू बरसला होता 
आणि कृतज्ञता भरून धन्यवाद मनात ठेवून 
हे झाड जगले होते
जगत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

रस

रस
****
कैवल्याचा रस वाहे पानोपानी 
हिरवा होऊनी सळाळता ॥
जगती नांदता येतसे कंटाळा 
आतला उमाळा नावरतो  ॥
झन झन झन चालले कंपण 
पिंजारी कोठून आला बरे ॥
कण कण कण  मन ये पिंजून 
विचार कुंठुन जाती क्षणी ॥
कुण्या विरहात डोळा येई पाणी 
ओठात दाटूनी शब्द खुळे ॥
कधी अनामिक नशा ये दाटून
वाटते झिंगून सृष्टी गेली ॥
वरुषती घन साऱ्या दिशातून 
भिजल्या वाचून गती नाही ॥
भिजता भिजता जाहला मेघुटा 
विक्रांत कोरडा होता कधी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

माझ्यातला

माझ्यातला (उपक्रमासाठी)
**********
पांघरून  नभ नील 
चांदण्यात निजलेला 
होऊन फकीर मस्त 
मज पहायचे आहे ॥
नसेल नाव गाव नि 
पद प्रतिष्ठाही काही 
सोपवून जीवनाला 
मज जगायचे आहे ॥
भरेल पोट अथवा 
राहील कधी उपाशी 
माझ्याहून वेगळा त्या 
मज पाहायचे आहे ॥
देती हुलकावणी ते 
क्षण शून्य स्पर्शलेले 
सदा सर्वकाळ त्यात 
उगा राहायचे आहे ॥
घेऊन माथ्यावरी जो 
ओझे सदा कामनांचे 
माझ्यातला माणसा त्या 
मज भेटायचे आहे ॥
त्या कामना त्याच्याच का 
तो कामनाच केवळ 
जाणले शब्दात सत्य
डोळा पाहायचे आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

ज्वालामुखी


ज्वालामुखी
*********
धुमसतो ज्वालामुखी
उंच त्या शिखरावर
वाहे लाव्हा येतो धूर 
रूप असे घनघोर ॥

पान पान जळू गेले 
रान सारे मरू गेले
जाणिवेच्या हुंकारात 
गाव नामशेष झाले ॥

भय फार पाखरांना 
त्राण जाई उडतांना 
दुमदुमे  भयनाद 
फळ कुण्या कामनांना ॥

अंतरात कोंडलेला 
किती खोल असे जाळ
 ठाऊक न उलटला 
किती युगे युगे काळ ॥

पुन्हा एक जाग येता 
तोच तप्त वेगावेग
आणि नभी उलटते 
एक दैवी गोल रेघ ॥

थरारत्या स्मरणात 
हादरतो कणकण 
उठूनिया लोपतसे
सनातन जागरण ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 


भारत रत्न अन् जुगार

भारतरल व जुगार
***************
जेव्हा भारतरत्न 
जुगार खेळा असे सांगतात 
तेव्हा तोंडात बोट जातात 
आश्चर्याने दुःखाने उद्वेगाणे 
नट नट्यांचे ठीक आहे 
पैसाच त्यांचे दैवत असते 
त्यांनी काही केले तरी 
त्या पाठीमागे तेच ते 
पैशाचे गणित असते 
कदाचित त्यांना कशाचे 
सोयर सुतकही नसते 
ऐषआरामात जगणे 
हेच त्यांचे ध्येय असते 
पण भारतरत्न देशाचा देव असतो 
तरुणांचा आदर्श असतो
तो तरी पाघळू नये पैसा पाहून असा 
कढई तील तुपासारखा 
कदाचित सरत असेल ही 
त्याची गंगाजळी 
तर त्यांनी तसेच सांगावे 
आम्ही त्याला काहीच 
कमी पडू देणार नाही 
रिटायर आईबापाला देतोच ना आम्ही 
आपल्या उत्पन्नाचा हिस्सा 
तर मग देवाला द्यायला 
काय हरकत आहे 
पण त्याने असे तरुणाईला 
पथ भ्रष्ट करू नये खरच करू नये

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

होशी दत्ता

होशील दत्ता ********* कुणासाठी होशी दत्ता तू रे देव  स्वीकारशी भाव हृदयीचा ॥१ कुणासाठी होशी दत्ता तू रे बाळ  कृपाळ प्रेमळ लीलाधर...