मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

महापुरुष

.महापुरुष 
****
महापुरुष बरे असतात 
जन्मदिवस पुण्यतिथी 
साजरे करण्यासाठी 
हार माळा फुले 
फोटोवर पुतळ्यावर
उधळून गाणी गाण्यासाठी 
महापुरुषाचे विचारधन 
नको असते कोणाला
जातीजमातीत वंशात 
उभा करून त्याला 
राहायचे असते लोकांना 
कारण आकाशात उडून 
अथांग आकाश होता 
येत नसते त्यांना 
तो त्याग ती तपस्या ते दुःख 
ती वेदना झेपत नसते त्यांना 
खरंतर कधी कधी ती 
एक गरजही असते त्यांची 
आपले इवलाले स्वार्थ 
महत्त्वकांक्षा पुऱ्या 
करून घेण्यासाठी
एक कळप एक झुंड 
एक दहशत निर्माण करण्यासाठी 
बऱ्याच वेळेला 
त्या झेंडा खाली जमणे 
हे नाईलाजाचे असते 
एक ओढवून घेतलेली 
जबरदस्ती असते त्यांच्यावर 
कारण जीवनाचे 
बळी तो कान पिळी 
हे सूत्र भिववत असते त्यांना 
हे सूत्र माहीत असते त्यांना 
दिसत असते त्यांना 
म्हणूनच महापुरुषाचे प्रतिमापूजन
 हे एक बळाचे साधन 
म्हणून स्वीकारून
 प्रत्येक वंश धर्म समाज गट 
स्वतःलात फसवून
त्यांचा अनुयायी म्हणून 
मिरवत असतात
अन त्या युगपुरुषाला खुजे करून 
तट बांधत असतात पुढारी 
दऱ्या वाढवत असतात राजकारणी 
साऱ्यांनाच दिसत असते 
कळत असते  
पण स्वार्थापुढे कोणाचेच 
काही चालत नसते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...