घेई जगून
********
जीवन आपल्या निसटून
आषाढाचा पाऊस होऊन
धुंदपणे घ्यावे जगून
क्षणोक्षणी आनंदाचे
झरे येतात उफाळून
दगड थोडे माती थोडी
ठेव जरा बाजूस करुन .
फार काही अवघड नाही
फक्त प्रवाही वाहत राही
प्रवाहातील प्रतिबिंबात
हरखून आणि हरवून जाई
मैत्र भेटतील कधी जीवाचे
जीव त्यावर देई उधळून
सुखदुःखाचे क्षण इवले
घे तयाला घट्ट कवळून
भय पापाचे अन पुण्याचे
होत निरागस दे उधळून
पद प्रतिष्ठा जा विसरून
आनंदाचा कण तू होऊन
जे लाभले त्या कृतज्ञ होऊन
जे गेले त्या निरोप देऊन
या क्षणातील चिरंतनाशी
नाते आपले घेई जुळवून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा