सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

भेट


गाडी धडाडत होती
रात्र वाढत होती 
त्या समोरील बर्थवर
ती ही जागीच होती 

लाकडी बर्थचा तो तर

होता बहाणाच खरतर
झोप कशी लागणार मज
असता ती अशी समोर 

एका दिवसाची ओळख

मनास या व्यापून होती
उगाच बोललो काहीबाही
मनी प्रीत उमलत होती 

काय बोललो अन मी किती

याची नसे जरी आज स्मृती
पण ती रात्र अद्भुत अशी की
माझ्या देही झिनझिन होती 

वदलो मी न राहवून तिला

डोळे तुझे सुंदर दिसती
मनास माझ्या जणू की मी
ठेवले होते शब्दावरती 

भाव माझे  येताच कळून

काही क्षण थबकून हसून
दिधले उत्तर तिने काही
धीर माझा थोडा वाढवून 

त्या तिच्या मधुर हसण्याने

जीवन आले असे फुलून
सारी रात्र होती धडधड
सारी रात्र केवळ स्वप्न 

पण त्या सुंदर भेटीची 

गुंफण कधीच विणली नाही
जागी झाली ओढ तरीही 
थोरा समोर धजली नाही  

कश्यास नकळे मग तिची 

ती भेट अशी झाली होती
सारेच प्रवास असेच का 
विरही निरोपचे असती 

तो प्रवास अन ते हसणे

सारे कालचे जणू वाटते 
अशीच यात्रा घडता कधी
ती मनात रुंजी घालते 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २६ डिसेंबर, २०१२

दत्त दत्त दत्त
दत्त दत्त दत्त

मुग्ध झाले चित्त

सदोदित गात

तेच नाम ll ll  

आणि आठवत 

कृपाळू ते स्मित

आनंदे व्यापत

तनमन ll ll  

तया कळे सारे

काय माझे हित

असे जीवनात

सत्ता त्याची ll ll  

हसतो सुखात

रडतो दु:खात

असे कर्मगत

हे तो सारे ll ll  

परी सर्व काळ

असे त्याची साथ

डोईवरी हात

वाहतो मी ll ll  विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २३ डिसेंबर, २०१२

वखवखल्या विक्राळ जगी या


वखवखल्या
विक्राळ जगी या
पडला प्रश्न.

कसे ठेवावे
प्रियतम आपुले
फूल जपून.

चिंतेने मग
भयव्याकूळ झाले.
ते प्रियजन

हवे फुलाया
नच येत ठेवता
बंद करून .

पण बाहेर
भेसूर नराधम
क्रूर भयाण.

राक्षसगण
वा श्वान पिसाळले
बसले टपून.

कोण तयाला
करतील शासन
विलंबाविण.

कुकर्मा आधी
अविचारी हात ते  
टाके ठेचून.

शिवरायांचे
न्याय निष्ठुर जसे
होते शासन.

हात कापरे
अन बधीर व्हावे
दुर्जन मन.

असेच काही
भर रस्त्यात वा
यावे घडून.

तया पाहून
मग गळून जावे
त्राण तमाचे.

आणि चुकून
नच विचार यावे
मनी पापाचे.

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

तुझिया प्रेमाचा

तुझिया प्रेमाचा 
पडो न विसर
ऐसे हे अंतर 
तद्रूप व्हावे ll १ ll ll

जळो संसाराची 
व्यर्थ तळमळ
नाभिशी नाळ 
जुळावी पुन्हा ll२ ll

सार्थक व्हावे 
शिणल्या कायेचे
खेळ हे मायेचे 
कळो यावे ll ३ ll

आलो मी जेथून 
यावे ते कळून
उगमी न्हाऊन 
व्हावे कृतार्थ lll ll ४ ll

सर्वांगी ओंकार 
अवघा जागवा
मरुनी जावा  
नादी विप्र ll ५ llडॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍

पाउस म्हणतो

पाउस म्हणतो *********** वारा म्हणतो अडेल मी  पाणी म्हणते पडेल मी  या मातीच्या कणाकणातील  बीज म्हणते रुजेल मी ॥१ तळे म्हणते भरेल ...