शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

कामत सिस्टर



कामत सिस्टर
************
सदा सौम्य शांत असणाऱ्या
चंद्र किरणाची बरसात करणाऱ्या
मृदू बोलणाऱ्या
आत्ममग्न भासणाऱ्या
कामत सिस्टर
त्यांच्या नकळतच
त्यांचे वेगळेपण जपणार्‍या 

त्या कोणावर रागावल्या
तरी राग दिसायचा नाही
त्या कुणावर ओरडल्या
तरी शब्द लागायचे नाही
तर मग समोरच्याचा
उपमर्द ,अपमान करणे तर दूरच
काम करतांना
ज्या व्यक्ती सोबत असाव्यात
असे आवर्जून वाटते
त्यांच्यासोबत काम करणे
आनंदाचा भागच होते
अशा दुर्लभ व्यक्तीपैकी एक
काम सिस्टर आहेत

बऱ्याचदा सिस्टरांचे
बायोमेट्रिक हजेरी होत नसे
बोटावरील झिजलेल्या रेषा
व पातळ रेषा
हे त्याचे कारण शास्त्रीयअसेल ही
पण मला वाटते
सिस्टर बायोमेट्रिक करत आहे
हे त्या मशीनच कळत नसावे ,
इतके सौमत्व, हळुवारपणा
सोफ्टनेस त्यांच्यात आहे .

एका वर्षापूर्वी सिस्टर प्रमोट झाल्या निळ्या पट्ट्यातून
लाल पट्ट्यात आल्या
पण तो रंग त्यांना तेवढा पटला नाही त्या सदैव निळ्या पट्ट्यातील
निळेपण जपत राहिल्या
शांत, सुखद आणि शीतल .

त्यांना आता कुठलाही पट्ट्या नसणार खर तर
त्या पट्ट्याच्या पठडीतील नव्हत्या त्या प्रेमाच्या पठडीतील होत्या
त्यांच्या सुस्वभावी मितभाषी
मधु भाषी वागण्याने
त्यांनी जोडून ठेवलेत असंख्य प्रेमाची माणसे

रिटायर झाल्यावर
कोणी कोणाला फारसे आठवत नाही हे जरी खरे असले तरी
जेव्हा कधी क्वचित कुठे
आपला विषय निघाला तर आपल्याबद्दल चांगले म्हटले गेले
तर समजावे
आपण जिंकलो !

पण कामत सिस्टर
तुमच्याबद्दल तर मी अगोदरच म्हणतो आहे .
सिस्टर तुम्ही जिंकले आहे!!

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

काळाचा खाटिक

.

काळाचा खाटिक

************

बळीचा बकरा
जाई मिरवत
प्रेमाने भरत
धष्ट पुष्ट

गेला नाही तरी
शस्त्र धारधार
असे भाळावर
लिहलेले

काळाचा खाटिक
शस्त्र हातातले
जाणार चालले
मानेवरी

चल बा गुमान
तुझी नाही मान
जीवन मरण
आखलेले

हाती चार क्षण
कर त्याचे सोन
टाक ही मोडून
येरझार

विक्रांत सोडून
हिरवे कुरण
दत्ताचे अंगण
सेवितसे

***

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

उखाणे

उखाणे
******


जुन्याच फोटोला 
सुखाचे उखाणे
घालून साजणे
जाऊ नको॥
उन वैशाखाचे 
तापल्या भूमीचे 
तुज सोसायचे 
नाही आता ॥
होईल काहिली 
जळेल त्वचा ही 
कशाला अशीही 
वेडी होते ॥
गेले एक तप 
जाईल अधिक 
वेचून तू  सुख 
घेई आले ॥
सोडून त्या देई
कथा कौतुकाच्या
राजा नी  राणीच्या 
आता तरी ॥
असेल शितल 
छाया नागफणी 
तया खाली कोणी 
जाती का गं ॥
असो रीतभात 
थकलेले हात 
परी डोळीयात 
दीप जाळ ॥
**
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita. blogspot.com

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

ते आमुचे नव्हतेच




ते आमुचे नव्हतेच
****************

ते आमचे
नव्हतेच कधी
आम्ही तयाचे
जरी झालो कधी ॥
.
काळाने लादलेले
ओझे डोक्यावरी
इच्छे  इच्छेवीन
वाहतोय परी ॥
.
देश दिले त्यांना
मोहल्ले दिले त्यांना
गादीवरी बसायचा
हक्क दिला त्यांना ॥
.
प्रेम दिले त्यांना
इज्जत दिली त्यांना
डोक्यावर घेऊन
नाचलो ही त्यांना ॥
.
पण ते का झाले
नाही इथले कधी
इमान वाळवंटी
वा विसरले कधी ॥
.
तेही खरे "ते" नाही
आमचेच रक्त
भिनुनिया विष
जाहले विभक्त ॥
.
ते विष त्यातून
कधी येईल काढता ?
काय त्यांना कधी
येईल आमुचे करता ?

 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

कैवल्य पुतळा

*
कैवल्य पुतळा
************
कैवल्य पुतळा
म्हणती  तुजला
सख्या ज्ञानेश्वरा
संत सारे 
परि आम्हासाठी
मावुली प्रेमळ
होवूनी केवळ
राही देवा
जरी आम्ही नच
मोक्ष अधिकारी
बसू दे पायरी
सदा तुझ्या
तुझे नाव घ्यावे
तुजला पाहावे
ऐकावे नि गावे
वाटे जीवा
तुझिया शब्दांची   
काय सांगू  मात
जीवाच्याही आत
घर केले ५ 
तुझिया शब्दात
जागतो उठतो
जगतो निजतो
सुखाने मी ६ 
तव ज्ञानेश्वरी
मायेचा पदर
निवते अंतर
तेणे माझे
तुझा अनुभव
अमृताचा गोड
जीवा लावी ओढ   
भेटण्याची
तुझिया विरण्या
ह्रुदयात कळ
प्रेमाचे वाद्ळ
मज दावी
काय किती लिहू
देवा तुझ्या साठी
काळजाच्या गाठी
बैसला तू १०
देवा पांडुरंगा
जन्म दे अनंत
ठेव आळंदीत
परि मला ११
मग मी गाईन
फक्त ज्ञानेश्वर
इंद्रायणी तीर
होवूनिया २ ॥
विक्रांता मागणे
देई देवा हेच
मातीत मी याच
सदा राहो १३



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

रुजलेले बीज



केव्हढाआकांत 
केव्हढा गोंगाट
चालला जगात
माझ्यामुळे

सुख नाही जगी
सांगतात संत
तरीही गाळात
पाकाल मी

जया जिथे जन्म
तया तिथे जीणे
वावगे वाहणे
अन्य कुठे ?

आहे इथे देव
आणिक दानव
होवून मानव
स्वस्थ राहि  

जरी मन नाही
मजा आहे खरी
तरिही धरीत्री
भांडावली

अकार उकार
मकार साचार
सृष्टीचा व्यापार
अहर्निश

विक्रांत गोंगाटी
क्षीण कुजबुज
रुजलेले बीज
अंतरात

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

======

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

तुझे कैवल्याचे देणे





तुझे कैवल्याचे देणे
*******************
तुझे कैवल्याचे देणे
माझ्या मनी उगवले
मन इवले इवले
सारे नभाकार झाले

माझे मावुली प्रेमळ
किती आबाद तू केले
शब्द हिरे मोती सोने
राज्य पृथ्वी मोल दिले

केला  जन्मांचा उद्धार
किती कौतुक मांडले
ऋण सरले वाचेचे
तुवा जवळी घेतले

बाळ नेणताच होतो
खेळ संसारी रमला
हाक मारूनी प्रेमाने
अर्थ सारा दाखवला

तुझ्या प्रेमे जीवलगा
खेळ जन्मची हा झाला
ऐसा  आनंद आनंद
काळा गिळुनि बैसला

इथे नांदतो विक्रांत
देह कारणे केवळ 
आत शब्द ज्ञानदेव
चाले प्रेमाचा कल्लोळ

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

श्री शिव शंकर



श्री शिवशंकर
***********
श्री शिवशंकर डमरू वाजवे
कैलासाला अन जागवे
डुडूम डुडूम डम डं डं डं
ध्वनी हृदयाला हालवे

जटा पसारा नटला
हा व्याघ्रांबरी सजला
बहू देखना कर्पुरगौरा
विभूती वरी भाळला ॥

हाती त्रिशूळ झळाळे
विद्युत पूरच लोटला
केशकलापी गंगामाता
जलफेर भोवती धरला ॥

 वैराग्याचा जणू वोतला
त्रिगुणातीत हा पुतळा
ब्रम्हा विष्णू ज्यात लीन
जगत पसारा मांडला ॥

माय भवानी शक्ती हृदया 
एक रूपी  तो मिनला 
विश्वाकार विश्वात्मा जो
विश्व कोड्यात लपला

शिव शंकरा हे अवधूता
देई शरण या विक्रांता
ठेवी पदा तव सदा सदा
सदाशिवा हे हर दुरीता .॥
**

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

कळवळा

कळवळा ******* अडकले चित्त सुखात दुःखात  संसार भोगात जडवत ॥ दीपाचे दीपक स्वयं प्रकाशक  मागतात भीक दारो दारी ॥ अन रिक्ततेची लागुनी...