सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

देहाचे या फुल






सुटू सुटू पाहे 
देहाचे या फुल 
शोधतांना मुळ
जीवनाचे .

आलो उमलून 
कळल्यावाचून 
सौख्याचे घेऊन 
वरदान 

भोगले ते दुःख 
वाटय़ास आलेले 
डंख मारलेले
प्रारब्धाने 

उधळला गंध 
साठलेला आत
केला आसमंत 
सुगंधित 

नाही उमटली 
आस कधी मनी 
ठाऊक कहाणी 
देहाची या 

सुंदर जाहले
अवघे जीवन 
जरी दयाघन
भेट नाही 

फुलाची या माती 
मातीचेच फुल 
फिरते वर्तुळ 
सदोदित 

परि कधीतरी 
येईल तो कुणी 
नेईल खुडूनी
देवालयी

तोवर विक्रांत 
जन्म पुन्हा पुन्हा 
ज्ञानदेव मना
ठेवूनिया 



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...