मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

एक कविता दोन विचार



एक कविता दोन विचार
***********************
अ‍

जळो तुझे गीत
माझ्या जीवना रे
ओघळून सारे 
पडो खाली 

तुटो फुटो जग 
लागो तया आग 
अवघाच राग  
व्यर्थ पाही

नको चिटकावू
शब्द गोड गोड 
भ्रमातच कोड
पुरवून

क्षण संवेदना 
अनंत यातना
सारी  दुनिया
अरे  इथे

जळलेले स्वप्ना
राहू दे जळले 
वेदनांची फुले 
सवे माझ्या

जन्म अमावस्या 
येईस्तो मरणा
आपुली आपणा
जाण नाही   

विक्रांत अंधार
निपचित ठार 
असे सभोवार
दाटलेला

0000000000000000000000000000

ब 

फुलो तुझे गीत 
माझिया मना रे
शब्द सुर सारे  
ओघळू दे  

मोहरावे  जग 
यावी तया जाग 
अवघा आवेग  
सार्थ होवो

क्षण संवेदना 
विसरो यातना 
हळुवार तना
सुखव रे
नको अडकू रे
गोड गोड शब्दा
सोड ते जगता
भोगावया

फुलव रे स्वप्ना
तया जे जळले 
वेदनांची फुले 
फुंकरून

जन्म चांदणे हे
सुंदर जगणे
आपण वाटणे   
दोन्ही हाती

विक्रांत होवून
सुखाचा सागर
आनंद अपार
 सभोवार

**
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...