सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

कैवल्य पुतळा

*
कैवल्य पुतळा
************
कैवल्य पुतळा
म्हणती  तुजला
सख्या ज्ञानेश्वरा
संत सारे  ॥ १ ॥
परि आम्हासाठी
मावुली प्रेमळ
होवूनी केवळ
राही देवा ॥ २ ॥
जरी आम्ही नच
मोक्ष अधिकारी
बसू दे पायरी
सदा तुझ्या ॥ ३ ॥
तुझे नाव घ्यावे
तुजला पाहावे
ऐकावे नि गावे
वाटे जीवा ॥ ४ ॥
तुझिया शब्दांची   
काय सांगू  मात
जीवाच्याही आत
घर केले ॥५  ॥
तुझिया शब्दात
जागतो उठतो
जगतो निजतो
सुखाने मी ॥ ६  ॥
तव ज्ञानेश्वरी
मायेचा पदर
निवते अंतर
तेणे माझे ॥ ७ ॥
तुझा अनुभव
अमृताचा गोड
जीवा लावी ओढ   
भेटण्याची॥ ८ ॥
तुझिया विरण्या
ह्रुदयात कळ
प्रेमाचे वाद्ळ
मज दावी ॥ ९ ॥
काय किती लिहू
देवा तुझ्या साठी
काळजाच्या गाठी
बैसला तू ॥ १० ॥
देवा पांडुरंगा
जन्म दे अनंत
ठेव आळंदीत
परि मला ॥ ११ ॥
मग मी गाईन
फक्त ज्ञानेश्वर
इंद्रायणी तीर
होवूनिया ॥ १२ ॥
विक्रांता मागणे
देई देवा हेच
मातीत मी याच
सदा राहो ॥ १३ ॥



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संसार

संसार **** संसार सरेना भोगणे ठरेना  जगणे पुरेना उपाधीला  एक तुटताच नवे उभे शिर  ऐसा कारभार वासनेचा  तेच जगी ताट तेच जगी पोट  येई...