सोमवार, २५ मार्च, २०१३

भैया



गाडीवर कांदे लसून बटाटे
घेवूनीया वाटे
लागे भैया
पायात स्लिपर्स डोईस कमचा
खपाट गालांचा
हडकुळा
दूर त्याचे घर बायको नि पोर
आला लांबवर
पोटासाठी
सदा मुखी हासू सदा बोले साब
ठेवूनिया आब
माल विके
लाघवी बोलणे व्यवहारी जिणे
नच घाबरणे
कधी कष्टा
तया न आळस घड्याळी दिवस
टपरी भुकेस
चालतसे
एकेक रुपया मोलाचा कमवी
गावाला पाठवी
नियमित
सरस तेलाची खिचडी रोजची
खावून पोटाची
भागे वेळ
अन रात्र होता कुठे ओट्यावर
विडी फेके धूर
अंधारात 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, २३ मार्च, २०१३

ll पुन्हा आळंदी ll




मना वाटे जावे l  इथेच संपून l 
पुन्हा जाणं येणं l घडो नये ll ll  
तुझिया स्वरूपी l  जावे मिसळून l 
शून्य हा होवुन l  देह प्राण ll ll  
सुटला मोह l  सुटली बंधनं l 
मनाच धावणं l  पांगुळलं ll ll  
प्राणाचा हा प्राण l  सामोरी पाहून l 
झरे नेत्रातून l  इंद्रायणी ll ll  
कोंदटला श्वास l  हुंदका दाटून l 
गेलो विसरून l  स्थळ काळ ll ll  
माझ्या मीपणाचा l  होवूनिया अंत l 
जाणिवेची मोट l  रिती झाली  ll ll  
चंदन तुळस l  गंध अबीराचा l 
विसर जगाचा  l  पडियेला   ll ll  
आनंद मनात l  आनंद देहात l 
निनाद कानात  l  पांडुरंग   ll ll  
जीर्ण गाठोड्यास l  हिसका बसून l 
आले संवेदन l  कसे बसे ll ll  
परतलो पुन्हा l  जड पावुलांनी l 
मर्जी स्वीकारुनी l  तुझी देवा ll १०ll 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुभ्र वस्त्रधारी




काल पर्यंत होते
वरवरी दुष्मन जे
हातात हात घालून
आज उभे आहेत
टोळ्यांचे साम्राज
धोक्यात आले म्हणूनी
सारेच ते आता
एक झाले आहेत  
आत्ता त्यांना आठवते
न्याय ,नियम, सन्मान
थडगेच  जयांचे ते
काल पुरून आले होते
गुर्मीतला माज
डोळ्यात झळकावूनी
निर्लज्य शुभ्र वस्त्रधारी
जग वेठीस धरुनी आहेत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २० मार्च, २०१३

ये रे ये रे देवा




ये रे ये रे देवा
तुला देतो मेवा
थोडा तुम्ही खावा
बाकी मला द्यावा

खूप वाट पाहून
देव नच येवून  
मी जाई कंटाळून
प्रसाद घेई खावून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...