रविवार, १ डिसेंबर, २०२४

रमेश बद्रीके

रमेश बद्रिके एक लाडका बार्बर
*********
म्हटले तर तो बार्बर होता 
म्हटले तर तो ड्रेसरही होता 
सर्वांसाठी धावणारा 
माणुसकी जपणारा .
कर्तव्यात रमणारा 
महानगरपालिकेचा 
तो एक प्रामाणिक नोकर होता 
सावळा वर्ण घनदाट केस भरगच्च मिशा 
नाकावर सरकणारा मोठ्या फ्रेमचा चष्मा 
आणि गालावर आलेला तंबाखूचा उंचवटा 
कधीही हजर हाकेच्या अंतरावर 
किंबहुना हाक मारायची नसायची गरज 
त्याची नजर बसलेली 
प्रत्येक जखम जोखाणारी 
रुग्णाची मानसिकता 
अचूक हाताळणारी 
त्याचे असणे असायचे 
बोनस जणू ड्युटीवर 
एक निश्चिती प्रसन्नता 
पसरायची मनावर 
तसा तो झाला होता रिटायर 
आठ वर्ष गेलेले उलटून 
पण भेटायचा अधून मधून '
त्याचे तेच प्रसन्न असणे 
विनम्र बोलणे आपुलकीने वागणे 
द्यायचे मला तोच संतोष 
अन स्मरायचे ते कॅज्युल्टीचे दिवस 
आणि कळले अचानक 
गेला तो हार्ट अटॅक येऊन 
परवा तेरवाच गेलेला सर्वांना भेटून
अठ्ठावण अधिक आठ म्हणजे 
सहासष्ठ वर्ष तसे काही फार नाहीत 
आणि तेही आजारपण नसतांना 
छानपैकी हिंडताना फिरताना 
पण जीवनाचा हिशोब कळतो काय कुणा
एक प्रेमळ मित्र जाण्याचे दुःख झाले जीवाला 
जीवनातून आणखीन एक तारा निखळला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...