स्वप्न चिंतन
*******
निजल्यावरडोळ्यासमोर उमटणारी
कुठल्याही शेंडा बुडखा नसलेली
चित्र म्हणजे स्वप्न नसतात
प्रसंग व्यक्ती विचार स्मृती
यांचा हा असंगत प्रवाह
म्हणजे स्वप्न नसतात
तर खरी स्वप्न
ही जागेपणीच पडतात.
अर्थात जागेपणी पाहिलेली
सारी स्वप्न काही पूरी होत नसतात
जीवनाला जगण्याला सीमा असतात
स्वप्नांना त्या कधीच नसतात.
कुणी या स्वप्नांना ध्येय म्हणतात
कोणी या स्वप्नांना कर्तव्य म्हणतात
कोणी या स्वप्नांना दिवास्वप्न ही म्हणतात
महापुरुषांची स्वप्न ही महान असतात अग्निदव्यातून जाणारी
तापून निवलेल्या सुवर्ण सारखी
लखलखीत असतात
सामान्य माणसाची
स्वप्नही सामान्यच असतात
चार भिंतीत मावणारी
चार माणसांचे सुख पाहणारी
पण निर्मळ प्रेमळ असतात
तशी स्वप्न तर मलाही पडतात
कधी पूर्ण होतात कधी अपूर्ण राहतात
पण माझे स्वप्न कधीच वाया जात नाहीत
कारण साऱ्याच माझ्या स्वप्नांच्या
कविता होतात
उतरताच स्वप्न सत्यात
साऱ्या सुख संवेदनांना टिपून
अलगद कागदावर उमटवतात
कधी मनातले दुःख
ओघळत कागदावर
आतल्या दुःखाचा निचरा करतात
हलकेच गोंजारत मनाला
शांत निवांत करतात
तर कधी केव्हाही पूर्ण न होणारे
स्वप्न शब्दात भोगवत
विषादाची काहीली दूर करतात
ही स्वप्न जागेपणातील
कधी कधी जागेपणालाही भिववतात
उंच ताशीव कड्यावर आणून सोडतात
कोणी कधी तिथून पडतात पाय घसरून
तर कोणी कधी देतात तिथून स्वतःला झोकून
स्वप्न जगवतात स्वप्न मारतात
स्वप्न हसवतात स्वप्न रडवतात
पण तरीही सारे स्वप्न पाहतात
स्वप्ना वाचून जगण्याला
खरंच काहीच अर्थ नसतो
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे kavitesathikavita. .
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा