सोमवार, ३० जून, २०१४

उगाच येवून




उगाच येवून उगाच बसून
काहीतरी मी गेलो बोलून
नव्हते देणं नव्हते घेणं
बस भेटावं वाटलं आतून
वृक्ष देखणा खिडकी बाहेर
डोलत होता हळू वाऱ्यावर
एक पाखरू पंख मिटून
बसले होते उगा भिजून
निळे आभाळ स्तब्ध गहन
हळूच आले आत ओघळून  
अन मनीची ती तळमळ
सहज झाली शांत नितळ

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २९ जून, २०१४

डसे काळजात चूक भूल



कालच्या सुखाची  
जळे पायवाट  
आणि डोळियात  
सरोवर ||
पुसता न येत
काळाची पावुले
आता चाललेले
खेळ व्यर्थ   ||
सुखांची मी भिक
मागावी कुणाला
असे ज्याची त्याला
प्रिय झोळी ||
एक एक दिन
जाळे उगा इथं
डसे काळजात
चूक भूल ||
फुलं प्रेतावरी
जशी श्रुंगारली
तशी ही सजली
जिंदगानी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

जा मज तुझा अंधार देवून






जळू देत स्वप्न वेडे
जीवा भूल घालणारे
अन तप्त उन्हाचे या
भान पुन्हा येवू दे रे

कसे म्हणू सखी तुला
स्वप्न व्यर्थ असते ग
ठरलेला भंग त्याचा
मजला पुन्हा नको ग

ते सुखांचे दिस माझे
गेले कधीच सोडून  
जरा जरा फुले हाती
जातो तुलाच वाहून  

जा सांभाळून तू सखे
सोबत प्रीत ही घेवून
जातांना पण जा मज
तुझा अंधार देवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कवी






सदैव झिंगलेला दिसतो
प्रेमात पडलेला दिसतो
वेडा कवी फक्त त्याच्या
शब्दात हरवलेला असतो

प्रेम ही चालते त्याला
प्रेत ही चालते त्याला
मुख्य म्हणजे लिहायला
सदैव उतविळ तो असतो

त्याच्या नादी लागू नका
जास्त जवळ जावू नका
दुरूनच चांगला दिसतो
वेड्या लाटेचा फटका असतो

स्वप्नातील प्रेम कधीही
तया जगी सापडत नाही
अन स्वप्नातून कधीही
तो खाली उतरत नाही

मग व्हायचे तेच होते
शब्द वेडे जगणे उरते
अन काळाच्या वावटळी
पान नि पान उडून जाते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

नावीन्य

नावीन्य  ******** नको वाटते काहीच पुन्हा नव्याने करणे  वाळूचे बांधून किल्ले पुन्हा एकदा मोडणे ॥ तोच तोच खेळ असा पुन्हा पुन्हा खे...