गावामधुनी दूरदूरच्या
वेडी आशा घेवून आली
भरतीमध्ये उष्माघाती
पाच लेकरं मरून गेली
घर विझले द:ख फुटले
माळावरती कुणी आक्रंदले
अन मातीच्या छपराखाली
त्या आईचे दूध जळले
**
भक्कम देह निधडी छाती
काटक राकट पोरं मराठी
कुणा तुघलक लहरी साठी
होवून गेले होते माती
कुठल्या तरी अजान जागी
मरतो का कळल्या वाचूनी
तडफडणारी क्षुब्ध यात्रा
भडकून क्षणात गेली विझुनी
**
आणि तरीही जीव हजारो
पाणवठ्यावर येतच होते
कोण जाणार कोण राहणार
जरी कुणाला माहित नव्हते
रस्त्यावरती कुठेतरी ते
यमदूत ही बसले होते
जगण्यासाठी मरणाला
कित्येक स्पर्शून जात होते
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा