मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

ज्ञान सूर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर )

ज्ञान सूर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर )
******
अफाट या कालप्रवाहात 
अगणित सूर्योदय होतात 
तेजस्वी प्रकाशमान शुभ्र 
अन विश्व उजळून टाकतात 

प्रत्येक सूर्याला असते 
एक विलक्षण कहाणी 
ती एक रात्र गोठवणारी 
भरून गेलेली दुःख वेदनांनी 

पण हा भीमरूपी सूर्य 
ज्या गावात उगवला होता 
या गावाने कधीच कुठला 
सूर्य पाहिला नव्हता

चक्षूचेही भान नसलेला गाव 
होता चाचपडत रडत जगत 
पाठीवरती अन्यायाचे चाबूक 
होते रात्रंदिन उगाच बरसत 
कोण मारतोय का मारतोय 
हेही नव्हती नीट कळत 
पण आपण भोगतोय रडतोय 
म्हणजे नक्कीच आहोत चुकत 

अशी अंधाराचा स्वीकार केलेली 
खोलवर उजेडाची स्वप्न पुरलेली 
स्वतःला नशिबाच्या स्वाधीन केलेली  
ती प्रजा होती आंधळी अन दुबळी 

पण जेव्हा त्या गावाला मिळाला सूर्य 
लखलखता तळपता ज्ञानसूर्य 
तेव्हा हजारो लाखो आंधळ्यांना 
आले तेजस्वी चमकदार डोळे 
दिसू लागली स्पष्ट आरपार कळले
आपणच आपले हात आहेत बांधले

त्या एका तीव्र किरणाने 
एका ज्वलंत प्रखर ठिणगीने 
पेटून उठले सारे रान अन
अंधाराची सुल्तानी गेली संपून 

मग या सूर्याचे सहज झाले 
असंख्य अगणित सूर्य कण
त्याने व्यापून टाकला कणकण 
त्या गावातील प्रत्येक विद्ध मन 

अन आता या गावातील
हा प्रकाश कधीच 
सरणार नाही 
याची खात्री बाळगत 
झाला तो अस्तंगत 
रुढार्थाने पण 
आहे प्रत्येकात जळत
तळपत
आपले अस्तित्व 
पुन:पुन्हा सिद्ध करत..

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...