गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

ऋतू

ऋतू 
*****

ऋतू कोरडा तो जाता 
मेघ ओशाळे सावळा 
पान रुसत एकेक  
झाली मातीवर गोळा 

हाती असते कुणाच्या 
इथे रुजणे फळणे 
पाणी ओघळते डोळा 
व्यर्थ हसणे रडणे 

पुढे असेल-नसेल 
जन्म पाहिला तो कुणी 
लाख सुचतात ओळी 
परी होत नाही गाणी

दिसे भिजलेले स्वप्न 
कधी पहाट वार्‍याने 
पण उघडता डोळे 
जग तेच सुने सुने 

दुःख साकळून गाठ 
मनी होय काळी-निळी 
तुझे प्रेम आहे दत्ता 
माझी दवा सर्वकाळी 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...