मराठी साहित्य संमेलन
********
हे अध्यक्ष लोकांचं वाचून
गंमत वाटली.
हसायालही आलं.
माणसच असतात शेवटी सारी.
कुणी भडकलेले .
कुणी अडकलेले .
कुणी दडपलेले.
कुणी कुणाला निष्ठा वाहिलेले .
आणि अध्यक्षाला
असं काय किती महत्व असतं
हे फक्त प्रकाशकालाच कळत
अन खरेतर ते गणिताचंही असतं.
बाकी आम्हाला काय त्याच ?
कुणी का बसाना तिथं
कुणी का बोलेना !
किंवा ना बोलेना का!
कधीकाळी डोळ्यातूनही
आग ओकणारा वाघ
पोट भरला की शांत होतो.
अन तशीहि वाघांची गणणाही
फार कमी होत आहे आता.
पण पुस्तकांचा प्रकाशकांचा
अन लेखकांचा कवींचा
हा वसंत ऋतुच .
तिथे हवसे नवसे गवसे
आवर्जून येणारच .
अन कुठल्यातरी
भिरभिरत्या डोळयात
उत्सुक मनात
हरखल्या जीवात
माय मराठीचे बीज पडणार
त्या एका बीजासाठी तरी
हा सारा उपद् व्याप सार्थ आहे .
**
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा