शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

कपटा

कपटा
*****

जन्म वितळत आहे 
अस्तित्वाचा अर्थ न कळता 
घनीभूत झालेला 
प्रत्येक प्रश्न सतावत आहे 
खोलवर आत 
मोडलेला काटा होत
सदैव ठसठसत .

उपायांचा निरुपाय झाल्यावर 
राहावे लागते जगत 
आपल्या व्याधीला 
आपणच स्वीकारत 
तसेच काहीसे होत जात 
काळही करतोच बोथट 
वेदना संवेदना 
मनास गुंतवतो 
कशात नि कशात 
कधी संगीतात कधी सिनेमात 
कधी कवितात कधी आठवणीत 
कधी अध्यात्मिक ग्रंथात 
अन् मनोराज्य असतातच शेवटी 
मग आपण जातो 
निद्रेच्या राज्यात 
सारे काही विसरत 
स्व त: ला हरवत.

पण कधीकधी असेही होत
अर्ध्या रात्रीही करमत नाही 
मन कशातच लागत नाही 
पराजयाची ध्वजा 
फडफडते उरावर 
असहाय निष्क्रियता 
व्यापुन उरते जगावर 
हीसुद्धा एक लाट असते 
मिटणार हे माहीत असते 

पण मग ती रात्र ती लाट 
व ते जागेपण 
यांच्या वादळात 
मी पणाचा कपटा 
त्या प्रश्न सकट राहतो 
भिरभिरत आपटत 
फाटत विदीर्ण होत

वाटते कधीतरी 
कुठल्यातरी लाटेत 
सरतील प्रश्न 
या अस्तित्वाच्या कपट्यावरील 
पुसतील सहज 
भिजत भिजत
वा संपेल तो कपटाच
त्या प्रश्न सकट 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घेई सोबत

घेई सोबती ******** कंटाळून जगताला  म्हणे विक्रांत दत्ताला  का हो टाकले मजला  ऐश्या या भोगवट्याला  तुम्ही घेतले ते छान  एक कौपीन ...