शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

दत्त कळणे

दत्त कळणे
*********

डोळे पाहत नव्हते 
मन जाणत नव्हते 
दत्त डोळ्यातून या
मनी उतरत होते 

दत्त कळल्या वाचून 
गुण ऐकल्या वाचून 
प्रेम मनात माझ्या 
उगा दाटलेले होते 

दत्त उभा भिंतीवर 
बाल्य बहरत होते 
क्षण क्षण वेडावून 
भक्ती आकारत होते 

दत्त स्वप्नात येऊन 
गेले किंचित भेटून 
वय नादान लहान 
सारे विसरत होते 

खेळ इतका वाढला 
दत्त विसर पडला 
स्वामी साईचा रूपाने 
मज सांभाळत होते

गेलो वाहत वाहत 
दूरवरच्या वाटेने 
अंती थांबलो तेथेच
दत्त प्रभू उभे होते 

दत्ता मी न निवडले 
देवे मज स्वीकारले
कृपा असीम अपार 
विक्रांत बाहुले होते

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...