मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

बासरी

बासरी
*****

दूर कुठेतरी 
वाजते बासरी 
मनात साजरी 
मुर्त तुझी ॥

तुझे मंद हसणे 
तुझे मृदू बोलणे 
डोळ्यात पाहणे 
खोलवर ॥

तव आठवांची 
मालिका क्षणात
वाहते डोळ्यात
पुन:पुन्हा ॥

तव खांद्यावर 
ठेवुनिया मान
हरवून भान 
जाते जणू ॥

कधी गमे मज 
बासरी मी होते
अन सुरावते 
तव ओठी ॥

होते तो चंद्रमा 
शुभ्र पौर्णिमेचा
तुझिया रुपाचा 
दर्पणची ॥

होते वा यमुना 
खळाळती मंद 
कणोकणी धुंद 
उसळती ॥

हरवते कृष्णा 
माझे राधापण 
जगते होवून
कृष्णमय ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...