काही गूढ प्रश्न
=========
उमटण्याआधीच रे
प्रश्नही पुसून गेले
उत्तराचे भाग्य थोर
मग हरवून गेले ॥
तसे पाहीले तर तो
पेपर सोपा नव्हता
कधी नच वाट्या आला
विषयाचा स्पर्श होता ॥
खरे खोटे त्यात काही
कळण्या मार्ग नव्हता
म्हटले तर खेळला
नकळत डाव होता॥
डोळ्यावर काचा काळ्या
खोल किती असे ठाव
पाहण्यास पाहणाऱ्या
नव्हता मुळीच वाव ॥
तरी उडी घेतली नि
काच काळी तडकली
काच असे काच अंती
उगाच कापून गेली ॥
कापलेच काही जरी
घाव खोल नसे तरी
डोळीयांची चिंता का रे
सदोदित असे उरी ॥
ते ही गूढ हे ही गूढ
गूढ असे सारे काही
प्रश्न हवा होता तरी
सुटल्या तो वाचूनही ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा