शनिवार, २३ मार्च, २०१३

ll पुन्हा आळंदी ll




मना वाटे जावे l  इथेच संपून l 
पुन्हा जाणं येणं l घडो नये ll ll  
तुझिया स्वरूपी l  जावे मिसळून l 
शून्य हा होवुन l  देह प्राण ll ll  
सुटला मोह l  सुटली बंधनं l 
मनाच धावणं l  पांगुळलं ll ll  
प्राणाचा हा प्राण l  सामोरी पाहून l 
झरे नेत्रातून l  इंद्रायणी ll ll  
कोंदटला श्वास l  हुंदका दाटून l 
गेलो विसरून l  स्थळ काळ ll ll  
माझ्या मीपणाचा l  होवूनिया अंत l 
जाणिवेची मोट l  रिती झाली  ll ll  
चंदन तुळस l  गंध अबीराचा l 
विसर जगाचा  l  पडियेला   ll ll  
आनंद मनात l  आनंद देहात l 
निनाद कानात  l  पांडुरंग   ll ll  
जीर्ण गाठोड्यास l  हिसका बसून l 
आले संवेदन l  कसे बसे ll ll  
परतलो पुन्हा l  जड पावुलांनी l 
मर्जी स्वीकारुनी l  तुझी देवा ll १०ll 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोभ

लोभ ****** फुटली उकळी  गाणे आले गळा  प्रेमे उजळला  गाभारा हा ॥ १ शब्द सुमनांनी  भरले ताटवे भ्रमराचे थवे  भावरूपी ॥ २ पसरला धूप  ...