कविते बद्दल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविते बद्दल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १६ मार्च, २०२०

कवितेत दत्त



कवितेतील दत्त
**
जर कधी तुम्हाला
माझ्या कवितेत
दत्त दिसत नसला
तरीही दत्त
तिथेच वसत असतो
जरी मी वाचेने
म्हणत नसलो
तरीही त्यालाच
स्मरत असतो

माझ्या कवितेतील दत्त
नसतो ही त्रिमूर्ती
दंड कमंडलू धारी
कधी कधी तर
त्याला नसतो आकार
पण तो आहे हे
पाहणाऱ्याला करते

दोन ओळींमधील अंतरात
अगदी सहजच व्यक्त होतो
माझ्या कवितेतील दत्ताला
तुम्ही दत्त म्हणावे
हा हट्टही नसतो
खरंतर सहस्त्रनामाचे
प्रत्येक बिरुद 
तिथे कमी पडत असते
रूढ अर्थाने म्हणाल तर
 ते भक्त गीतही नसते
पण भक्तीशिवाय त्यात
बाकी काहीच नसते

म्हणूनच माझ्या कवितेत
दत्त दिसला नाही तर
ती कविता माझी नाही
असे तुम्ही खुशाल समजा

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

एक कविता दोन विचार



एक कविता दोन विचार
***********************
अ‍

जळो तुझे गीत
माझ्या जीवना रे
ओघळून सारे 
पडो खाली 

तुटो फुटो जग 
लागो तया आग 
अवघाच राग  
व्यर्थ पाही

नको चिटकावू
शब्द गोड गोड 
भ्रमातच कोड
पुरवून

क्षण संवेदना 
अनंत यातना
सारी  दुनिया
अरे  इथे

जळलेले स्वप्ना
राहू दे जळले 
वेदनांची फुले 
सवे माझ्या

जन्म अमावस्या 
येईस्तो मरणा
आपुली आपणा
जाण नाही   

विक्रांत अंधार
निपचित ठार 
असे सभोवार
दाटलेला

0000000000000000000000000000

ब 

फुलो तुझे गीत 
माझिया मना रे
शब्द सुर सारे  
ओघळू दे  

मोहरावे  जग 
यावी तया जाग 
अवघा आवेग  
सार्थ होवो

क्षण संवेदना 
विसरो यातना 
हळुवार तना
सुखव रे
नको अडकू रे
गोड गोड शब्दा
सोड ते जगता
भोगावया

फुलव रे स्वप्ना
तया जे जळले 
वेदनांची फुले 
फुंकरून

जन्म चांदणे हे
सुंदर जगणे
आपण वाटणे   
दोन्ही हाती

विक्रांत होवून
सुखाचा सागर
आनंद अपार
 सभोवार

**
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १९ जानेवारी, २०२०

वाहवा




वाहवा
********

काल वाहवा करणारे  
गेले आज निघून आहे
कंटाळले काही कुणाचे       
गेले काम सरून आहे

तरीही मी लिहितो आहे
गातो मनापासून आहे
अटळ प्रवास अवघा हा
चालणे बाकीअजून आहे

खरतर ही स्वप्नदुनिया
मनात या विखरूनआहे
शब्द सोहळे उगा मांडले
बघे जात डोकावून आहे

येतील काही नवे आणिक
नवी वाहवा मिळणार आहे
खोटी नसेल जरी ती ही
किंमत त्यांची जाणून आहे



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

दत्त कवित्व


दत्त कवित्व
*********

शब्दांवर शब्द
रचत रचत
राहतो करित
कवित्व मी ॥

शब्दांचे हे टाळ
कुटत कुटत
राही आळवत
दत्ता तुज  ॥

लयीचा मृदुंग
सुरांची वा जाण
असल्या वाचून
गाणी गातो ॥

तुझा कानाडोळा
कळतोय मला
मना पण चाळा
अन्य नाही ॥

वेडाची आवड
आवडीचे वेड
नाही रे सुटत
काही केल्या ॥

घेई बा ऐकून
देई वा सोडून
माझे मी करीन
तुझ्यासाठी ॥

विक्रांत शब्दात
गेला हरवत
सुमनची होत
शब्दरूप ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

शब्द



शब्द .
***

शब्द चांदण्यांचे
शब्द प्रकाशाचे
शब्द अमृताचे
ज्ञानियाचे

मौन जगताचे
मौन या मनाचे
मौन जागृतीचे
 झाले काही

मोरपीस स्पर्श
घडे हृदयास
अनामिक हर्ष
 दाटलेला

दीप पेटलेला
डोळा देखियला
श्रोता सुखावला
आर्तीतला

सुगंधाचे लोट
दाटले अलोट
अमृताचा घोट
गळीयात

बुडाला विक्रांत
शब्दांच्या सहीत
जाहला अतित
ऐकण्याच्या

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

कवितेचे ऋतू

कवितेचे ऋतू
*********
मनाच्या मातीत
निजलेल्या कविता
वाट पाहतात
कुणाच्या स्पर्शाची
हलकेच जागवण्याची
कोवळ अंकुरांची

काही कवितांना
मिळतो तो ऋतू
उमलून देणारा
स्वप्न जागवणारा
आकाशात नेणारा

पण ज्या कविता
कधी अंकुरत नाही
अंतर उघडत नाही
त्या कवितांचे संपणे
अपरिहार्य असते
निसर्ग नियमानुसार

पण त्या त्यांच्या
विखुरल्या कणातून
हरवल्या पणातून
मनाची माती जाते
अधिक सुपीक होऊन

कारण जगणे म्हणजे
त्या मातीचे गाणे असते
कविता सृजल्या तरीही
अथवा करपल्या तरीही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, २६ एप्रिल, २०१७

तूच माझी कविता




हे माझे शब्द सारे तुझेच गीत गात आहे
खर तर तूच माझी कविता एक मूर्त आहे

तरीही शब्दांचा गोड अट्टाहास हा तुझा
मी मेघ होवून तुझ्यासाठी कोसळत आहे

कोसळून तुलाच सखी चिंब भिजवत आहे
तुझ्यासवे अन माझे अस्तित्व हरवत आहे

तुझे स्पर्श तुझे बोल होवून एकरूप यात 
पापण्यात तुझ्या बघ मीच ओघळत आहे

कळेना मला दिलेस काय तू मी घेतले
सहवासी तुझ्या मी आकंठ जगत आहे

पाहूस नको भोवताली जग साचलेले व्यर्थ
मी तुझ्यात तू माझ्यात अखंड वाहत आहे  

जाशील माघारी जेव्हा तू दिन सांजवता हळू   
दाटून आकाश माझे सदा तुझ्या सवेत आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर  तिकोणे

http:/kavitesathikavita.blogspot.in 

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

कविता लिहून घे




रक्त गरम आहे तोवर
लाल कविता लिहून घे
डोळ्यातल्या अंगाराला
कागद जाळता येवू दे

भेटेल ती तेव्हा रंग
नक्कीच गुलाबी होणार
आपसूक अन गालावरती
काही खुणा उमटणार  

प्रणय गीते बालकविता
विरह थोडा थोडी उदासी
हा तर मार्ग ठरलेला
चालणार शब्द प्रवासी  

भरतील साऱ्या वह्या
अन जातील कप्पे वाया
हरकत नाही यार हो
जगच शेवटी जाते लया

आपले गाणे भेटते स्वत:ला
आणि काय हवे आपल्याला
शब्दामध्ये भिजणे रंगने
क्वचित जमते इथे कुणाला

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in




रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...